नागपूर, दि. १८-६-२०२५ पावसाळा तोंडावर असताना नागपूर आणि विशेषतः मध्य नागपूरातील नदी नाल्यांच्या सफाई बाबत आमदार दटके यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. आमदार प्रवीण दटके यांनी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि अधिकाऱ्यांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत नाले सफाई ,पाणीसाठा आणि स्वच्छतेसंदर्भात परिस्थितीचा आढावा घेतला.
मध्य नागपुरातील हत्ती नाला, राहतेकर वाडी नाला, जामदार शाळेजवळील नाला, लेंडी तलावाजवळील नाला, तसेच रमण विज्ञान केंद्राजवळील नाला या ठिकाणची स्वच्छता प्राधान्याने करण्याबाबत सूचना दिल्या. नाल्यांत साचणारे पाणी, कचऱ्यामुळे निर्माण होणारा अडथळा आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता स्वच्छतेच्या कामांना तातडीने सुरूवात करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. गांधीबाग, सतरंजीपुरा, धंतोली, आसीनगर आणि हनुमान नगर झोन अंतर्गत येणाऱ्या या भागातील स्वच्छता तसेच पावसाळी नाल्यासंदर्भातील अडचणींबाबत त्वरित विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी आ दटके यांना आश्र्वासित केले.
या बैठकीत नागपूरचे माजी महापौर व भाजपा महानगर अध्यक्ष श्री दयाशंकर तिवारी, तसेच संबंधित झोनचे अधिकारी, माजी नगरसेवक, वॉर्ड अध्यक्ष, प्रभाग संयोजक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नाग नदीच्या स्वच्छतेबाबतही योग्य कार्यवाही करण्यात येत असल्याचे आयुक्त यांनी सांगितले, पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व प्रलंबित स्वच्छतेची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे अशा सूचना आ प्रवीण दटके यांनी दिल्या.