Published On : Thu, Sep 12th, 2019

जैविक खत निर्मिती प्रकल्प स्पर्धेत डॉ.राममनोहर लोहिया शाळा प्रथम

शिक्षण समिती उपसभापती प्रमोद तभाने यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

नागपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण व आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित जैविक (गांडुळ) खत निर्मिती प्रकल्प स्पर्धेमध्ये मनपाच्या डॉ.राममनोहर लोहिया माध्यमिक शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला.

गुरुवारी (ता.१२) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये शिक्षण समिती उपसभापती प्रमोद तभाने व अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या मनपा शाळांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. याप्रसंगी शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चाफलेकर, सहायक शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेंद्र सुके, सहायक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय दिघोरे, क्रीडा अधिकारी नरेश सवाईथुल यांच्यासह शाळा निरीक्षक, मनपाच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

जैविक (गांडुळ) खत निर्मिती प्रकल्प स्पर्धेतील प्रथम क्रमांकप्राप्त डॉ.राममनोहर लोहिया माध्यमिक शाळेला यावेळी मान्यवरांच्या हस्ते २१ हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह प्रदान करुन गौरविण्यात आले. विजेत्या शाळेचे मुख्याध्यापक संतोष विश्वकर्मा, संध्या राउत, प्रकाश देउळकर यांच्यासह विद्यार्थी निखील हारोडे व सुहानी भगत यांनी पुरस्कार स्विकारले.

स्पर्धेमध्ये दुसरे स्थान पटकाविणा-या लाल बहादुर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळेला १५ हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह तसेच तिस-या क्रमांकावरील वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळेला ११ हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. याशिवाय रविनगर उच्च प्राथमिक शाळा, नेताजी मार्केट हिंदी माध्यमिक शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय, सरस्वती तिवारी हिंदी माध्यमिक शाळा, विवेकानंद नगर हिंदी माध्यमिक शाळा, दत्तात्रय नगर मराठी माध्यमिक शाळा, सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळा या शाळांना प्रोत्साहन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्व शाळांना प्रत्येकी एक हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.

यावेळी शिक्षण समिती उपसभापती प्रमोद तभाने म्हणाले, शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटर यांच्या नेतृत्वात नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्वच्छ भारत अभियानामध्ये मनपाने सहभाग घेतला आहे. मात्र यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभागी होउन स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक आपल्या संकल्पनांना मूर्त रुप देण्यासाठीचा जैविक (गांडुळ) खत निर्मिती प्रकल्प स्पर्धा हा स्तुत्य उपक्रम आहे. स्पर्धेतील विजेते व सहभागी शाळांचे अभिनंदन करीत मनपाच्या सर्व शाळांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होउन मुलांकडून हे प्रकल्प करून घ्यावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

अतिरिक्त राम जोशी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. मनपाच्या काही शाळांमध्ये आधीपासूनच जैविक खत निर्मितीचे विद्यार्थ्यांना धडे दिले जात होते. स्पर्धेच्या माध्यमातून काही शाळांनी त्यात सहभागी घेउन मुलांना त्याची माहिती करुन दिली. मात्र हे केवळ स्पर्धेपुरता मर्यादित न राहता. मनपाच्या प्रत्येक शाळेमध्ये छोट्या ते मोठ्या शाळांना शक्य असलेल्या स्वरुपात जैविक खत निर्मिती प्रकल्प तयार करण्यात यावा. मनपाच्या शंभर टक्के शाळांनी यामध्ये सहभागी होउन आपल्या शाळांमध्ये मुलांकडून जैविक खत तयार करुन घ्यावे. शाळेमध्ये विविध कार्यक्रमांना आमंत्रित करण्यात येणा-या मान्यवरांना पुष्पगुच्छा ऐवजी खताचे पॉकीट देण्यात यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्लास्टिक बंदी बाबत मोठा निर्णय घेतला असून शाळांमधून प्लास्टिकचा वापर टाळण्याबबात जनजागृती करण्याचेही आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले.

प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर यांनी शिक्षण विभागातर्फे आयोजित करण्यात येणा-या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. तसेच जैविक (गांडुळ) खत निर्मिती प्रकल्प स्पर्धेची संकल्पना स्पष्ट केली.

यावेळी डॉ.राममनोहर लोहिया माध्यमिक शाळेची विद्यार्थीनी सुहानी भगत व वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळेचा विद्यार्थी रोशन शर्मा यांनी शाळेमध्ये राबविण्यात येत असलेल्या जैविक (गांडुळ) खत निर्मिती प्रकल्पाची माहिती दिली.

कार्यक्रमाचे संचालन क्रीडा अधिकारी नरेश सवाईथुल यांनी केले तर आभार सहायक शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेंद्र सुके यांनी मानले.