Published On : Fri, Jul 26th, 2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवा -डॉ. सुरेश खाडे

सामाजिक न्याय मंत्री यांची दीक्षाभूमीला भेट

नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असून त्यांचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केले.

दिक्षाभूमीला भेट देऊन परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी दीक्षाभूमी स्तुपाच्या अंतर्गत स्थित भगवान गौतम बुध्द यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, सुधीर फुलझेले, आर.एन. सुटे, महापालिकेचे सभापती संदीप जाधव, सभापती धर्मपाल मेश्राम, धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, नगरसेविका उषा पायलट, समाजकल्याण उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड, अनुसुचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी, डॉ. राजू पोतदार, रमेश भंडारी, अशोक कोल्हटकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

दीक्षाभूमी या पवित्र स्थळी भेट दिल्यामुळे मला फार समाधान लाभले असल्याचे सांगून डॉ. खाडे म्हणाले की, दीक्षाभूमी हे माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे. भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी सामाजिक न्याय विभाग सतत प्रयत्नशील आहे. या विभागाच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्या सोडविण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी दिली. बाबासाहेबांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. दीक्षाभूमी स्मारकाच्या विकासासाठी, तसेच या ठिकाणी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही यावेळी सामाजिक न्याय मंत्री डॉ. खाडे यांनी दिली.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या सभागृहात सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांचा स्मारक समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने स्मारक समितीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.