Published On : Fri, Jul 26th, 2019

शहिदांच्या त्याग आणि बलिदानाला अभिवादन करुन कारगिल विजय दिवस साजरा

उरी चित्रपटाला युवकांचा प्रचंड प्रतिसाद

वीर मातांचा पुष्पगुच्छ देवून गौरव

वीर जवानांच्या शौर्याला सलाम

Gold Rate
19 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,300 /-
Gold 22 KT ₹ 1,02,600 /-
Silver/Kg ₹ 1,29,600/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर: कारगिल युध्दामध्ये आपल्या जवानांनी केलेले अतुलनीय साहस व पराक्रमाची शौर्यगाथा ही प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. कारगिल विजय दिनानिमित्त वीर जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी तसेच युवकांना भारतीय सेनेबद्दल अभिमान व आकर्षणाचे प्रतिक म्हणून जिल्ह्यातील 17 चित्रपटगृहात ‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट दाखविण्यात आला. हा चित्रपट बघण्यासाठी युवकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून सैनिकांच्या अतुलनीय कामगिरीला मानाचा सलाम केला.

कारगिल ‘विजय दिना’ निमित्त सीताबर्डी येथील सिनेमॅक्स चित्रपटगृहात एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी वीरमाता श्रीमती लिलाताई देशमुख, वीरपत्नी श्रीमती शालिनीताई गायकवाड, श्रीमती कल्पना नखाते व वीर पिता रामलाल वर्मा यांचा पुष्पगुच्छ देवून गौरव केला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष राम कोरके, चंद्रशेखर आलेगावकर, नरेश बर्वे, माजी सैनिक अजय चव्हाण, ईश्वर लोडे तसेच जिल्हासैनिक कार्यालयातील अधिकारी, करमणूक कर निरीक्षक चंद्रशेखर क्षेत्रपाल, चित्रपटगृहाचे व्यवस्थापक कौशिक व्यास, जॉय शेगीकर आदी उपस्थित होते.

कारगिल ‘विजय दिना’ निमित्त युवकांमध्ये सैन्याबद्दल कर्तव्य भावना आणि अभिमान वृध्दींगत व्हावा, यासाठी जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृहात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘उरी’ या चित्रपटाचा विशेष शो दाखविण्यात आला. आपले भविष्य सुरक्षित रहावे म्हणून वीर जवानांनी आपल्या प्राणांची आहूती दिली आहे. हा क्षण वीर जवानांच्या शौर्याला सलाम करण्याचा असल्याचे यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले.

‘उरी’ चित्रपट जिल्ह्यातील 17 सिनेमागृहात दाखविण्यात आला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हा चित्रपट बघता यावा यासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी महाविद्यालय आणि चित्रपटगृह यांचे नियोजन करुन सुमारे 8 हजार 348 आसन क्षमता असलेल्या चित्रपटगृहात व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये मल्टिप्लेक्स चित्रपटगृहाचाही समावेश होता. शहर व जिल्ह्यातील बहुतांश सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सकाळी 10 वाजता उपस्थित राहून उरी चित्रपट बघितला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारगिल विजय दिनानिमित्त राज्यातील युवकांमध्ये सैन्याबद्दल कर्तव्यभावना व अभिमान वृध्दींगत व्हावा, यासाठी सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ‘उरी – द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाचा विशेष शो आयोजन करण्याबद्दल सूचना दिल्या होत्या.

Advertisement
Advertisement