Published On : Sat, Mar 24th, 2018

‘सरहद्द’ संस्थेला डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार जाहीर

Advertisement


नागपूर : गेली तीन दशके काश्मीरमध्ये शांततेसाठी काम करणारे संजय नहार यांच्या ‘सरहद्द’ या संस्थेला यंदाचा ‘डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.

दि. २२ जुलै २०१८ रोजी पुण्यात या पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याची माहिती सी.मो.झाडे फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास झाडे यांनी दिली. फाऊंडेशनतर्फे नागपूर येथे चालविण्यात येणाऱ्या सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्रातर्फे देशात सर्वोत्तम सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. १ लक्ष रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असते. डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्काराची सुरुवात २०१३ मध्ये करण्यात आली असून याआधी दिल्लीचे ज्येष्ठ गांधीवादी डॉ. एस. एन. सुब्बाराव, पुण्याचे ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी, दिल्लीचे कर्मयोगी रवी कालरा, धारणी मेळघाटचे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवी कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे याशिवाय गुवाहाटीच्या अर्थतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अलका सरमा यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सरहद्दचे संस्थापक संजय नहार आणि त्यांची चमू काश्मीरमध्ये शांततेसाठी कार्य करते. नहार यांनी १९९० च्या दशकात पंजाब, जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात सामाजिक कामाला सुरुवात केली. १९९५ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये शांततेचा संदेश देत सामाजिक कार्य करण्यासाठी नहार यांनी ‘सरहद्द’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. सरहद्दच्या माध्यमातून काश्मीरच्या मुलांना पुण्यात शिक्षण दिल्या जाते.