Published On : Wed, Apr 12th, 2017

नागपुरात तयार केलेला बाबासाहेबांचा पुतळा अमेरिकेला

Advertisement

Dr Ambedkar
नागपूर:
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती काही दिवसांवर आली असताना देशभरात आणि देशाबाहेरली जयंतीची जोरदार तयारी बघायला मिळत आहे. याचाच भाग म्हणून नागपुरात तयार करण्यात आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अमेरिकेत बसवण्यात येणार आहे. हा पुतळा अमेरिकेच्या ‘ब्रॅन्डीज युनिव्हर्सिटीच्या गोल्डफर्ब लायब्ररी’त बसविण्यात येणार आहे. नागपूरचे प्रसिद्ध शिल्पकार प्रज्ञा मूर्ती यांनी हा पुतळा तयार केला आहे. ८ एप्रिल रोजी तो विमानाने अमेरिकेत पोहोचला असून २९ एप्रिल रोजी अनावरण होणार आहे.

लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती १४ एप्रिल रोजी भारतासह जगात साजरी होत आहे. त्यानिमित्ताने हा पुतळा बसविण्यात येणार आहे. पुतळा हुबेहूब बाबासाहेबांसारखा असावा, यासाठी एका चमूने बऱ्याच मूर्तिकारांशी संपर्क साधला होता. नागपुरातील प्रसिद्ध शिल्पकार प्रज्ञा मूर्ती यांच्याकडे हे काम सोपविण्यात आले. दोन फूट उंच व ब्राँझचा असलेला हा पुतळा तयार करण्यास मूर्ती यांना दीड महिन्याचा कालावधी लागला. बाबासाहेबांची हुबेहूब मूर्ती तयार झाल्यानंतर तो पाहून ही चमूदेखील आश्चर्यचकित झाली.

‘लोकमत’शी बोलताना शिल्पकार प्रज्ञा मूर्ती म्हणाले की, नागपूरवरून हा पुतळा अमेरिकेत जाणार असल्याने व तेथील लोकांना बाबासाहेबांची थोरवी, त्यांची विद्वत्ता आणि त्यांच्या महान कार्याची प्रेरणा मिळणार असल्याने हा पुतळा अधिक आकर्षक व हुबेहूब करण्यासाठी बरेच परिश्रम घेतले. पुतळ्यातील बाबासाहेबांच्या ‘टाय’ व ‘ड्रेस’ला वेगळे ‘स्ट्रक्चर’ केले.

अर्धाकृती आकारात असलेला हा पुतळा तयार झाल्यानंतर आंबेडकरी चळवळीतील काही वरिष्ठ व्यक्तीही हा पुतळा पाहण्यासाठी आले होते. त्यांनी झालेल्या कार्याचे कौतुक केले.