Published On : Thu, Sep 3rd, 2020

पूरग्रस्तांनी मदतीबाबत काळजी करू नका, आरोग्याची काळजी घ्या : वडेट्टीवार

Advertisement

– प्रत्येक पूरग्रस्तांना मदत मिळवून देण्याची माझी जबाबदारी

गडचिरोली: प्रत्येक पूरग्रस्ताला वेळेत आणि आवश्यक मदत मिळणारच तेव्हा, पूरस्थिती नंतर प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्या असे आवाहन राज्याचे आपत्ती व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांशी बोलताना केले. गडचिरोली जिल्ह्यात अंदाजे 17033 हेक्टर पेक्षा जास्त शेतीचे पुरामुळे नुकसान झाले आहे. तसेच 4000 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. त्यामध्ये अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. याबाबत प्रशासनाकडून वेळेत पंचनामे करून प्रत्येक पूरग्रस्ताला न्याय देण्यासाठी मी आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून जबाबदार आहे असा दिलासा विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांना दिला. सध्या कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात आहे, तसेच आता पूरस्थिती ओसरल्यानंतर पुराच्या पाण्यामुळे तसेच दलदलीमुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरू शकते. या दुहेरी संकटाला सामोरे जात असताना प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक झाले आहे असे ते पुढे म्हणाले.

मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पूरानंतरच्या उपाययोजनेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी पूरस्थिती बाबत मंत्री महोदयांना माहिती दिली. पूरामुळे घरात पाणी शिरल्यामुळे 4174 लोकांना घरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून त्यांच्या जेवणाची व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. पुरामुळे 17033 हेक्टर आर शेती पाण्यात गेली असून शासन आवश्यक उपाययोजना करत असून लवकरच शेतकऱ्यांना तातडीने मोबदला देण्यात येणार असून 2019 च्या शासन निर्णयाप्रमाणे रुपये 5 हजार प्रमाणे तातडीची मदत देण्याची व्यवस्था करा असे निर्देश मंत्रीमहोदयांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

तसेच पूरामुळे ज्यांच्या घरात पाणी शिरले तसेच साहित्याची, जनावरे यांची नासधुस झाली असेल त्याबाबत प्रशासनाने पंचनामे करुन याबाबतचा अहवाल शासनास द्यावा. पुरामुळे घरांचे नुकसान झाल्यास तसेच पडझड झाल्यास पंचनाम्यानंतर शासनातर्फे रुपये 95 हजार देण्यात येतात. तसेच शेती करीता दर हेक्टरी रुपये 18 हजार प्रमाणे मदत करण्यात येणार आहे. त्याकरीता प्रत्यक्ष शेतावर जाऊन बारकाईने पंचनामे करुन कोणताही शेतकरी सुटणार नाही याकडे लक्ष देण्यात यावे असे निर्देश प्रशासनाला त्यांनी दिले. तसेच एकाच घरात राहणारे वेगवेगळे कुटूंब त्यांच्या सातबारा नुसार ज्यांची शेती वेगवेगळी आहे त्यांना समान मदत मिळेल अशी प्रक्रिया राबविण्यात यावी.

जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी यंत्रणा कामाला लागली असून वीज प्रवाह पूर्ववत करणे, नुकसानीचे पंचनामे, रस्त्यावरील व घरातील गाळ काढणे, पिण्याचे स्वच्छ पाणी पूरविणे, साथरोग पसरू नये यासाठी फवारणी व ब्लिचींग पावडर टाकणे, शिबीरातील नागरिकांची आरोग्य तपासणी व जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था आदी कार्य मोठ्या प्रमाणत सुरू झाले आहे त्याचा पाठपुरावा करून लोकांच्या अडचणी सोडवा याबाबत निर्देश मंत्र्यांनी बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

पुरानंतर रोगराईची शक्यता बळावते याकरीता आरोग्य विभागाने फिरते पथक तयार करुन प्रत्यक्ष जागेवरन जाऊन तपासणी करणे आवश्यक आहे. जिथे पाणी साचले आहे तिथे फवारणी करुन डासांची उत्पत्ती होणार नाही याकडे लक्ष घालावे. ग्रामीण भागात कॅम्प लावून ग्रामीणांनाही जागृती करणे आवश्यक आहे. डासांची उत्पत्ती रोकथामाकरीता डस्टींग, निर्जंतुकिंकरण करणे आवश्यक आहे. तसेच यावेळेस शुद्ध पाणी मिळेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे याकरीता ब्लीचींग पावडरचा वापर करुन शुद्ध पाण्याची व्यवस्था करणे. उकळलेले पाणी पिण्याकरीता सांगण्यात यावे अशा सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या.

रस्ते, शाळा, सार्वजनिक इमारती यांचे वेगवेगळे प्रस्ताव तयार करुन तो शासनाकडे पाठवा. याबाबत पाठपुरावा करुन जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी मिळविण्याचा मी प्रयत्न करेन असेही त्यांनी यावेळी सांगितले. उपस्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक व्यवस्थेला मदत मिळणे किंवा मदत देणे ही आपली जबाबदारी आहे. शेती, घरे, जनावरे याबाबतचा नुकसानीचा प्राथमिक अंदाज शनिवार पर्यंत देण्यात यावा, असे त्यांनी प्रशासनला निर्देश दिले आहे.

पूरपरिस्थितीबाबत झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, प्रभारी जिल्हाधिकारी अनंत वालस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, सहा.पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपवनसंरक्षक कुमारस्वामी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, ॲङ राम मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना निळ-ठुबे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर मंत्री महोदयांनी पूरस्थिती उद्भवलेल्या भागात दौरा केला. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील वसा, आरमोरी तालुक्यातील चुरमुरा, डोंगरसावंगी, कोंढळा येथे भेट दिली. तसेच वडसा तालुक्यातील शहरातील हनुमाननगर तसेच आमगाव, सावंगी गावात भेट दिली. चुरमुरा या गावात मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून 4 जणांना निधीचे वाटप करण्यात आले. यामध्ये देवराम खोपरे, लक्ष्मण मुराडे, सोमेश्वर चौधरी, रामदास चौधरी, या पूरग्रस्तांचा समावेश होता.

मंत्री महोदयांनी यावेळी भेट दिलेल्या प्रत्येक गावात पूरस्थिती उद्भवलेल्या भागात जावून प्रत्यक्ष पाहणी केली. धान शेतीबाबत बाधांवर जावून शेतकऱ्यांशी संवादही साधला. तसेच गावामधील पूरामुळे काही घरांची पडझड झालेली पाहणीही केली.

पूरामुळे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. याबाबत उपस्थित पूरग्रस्तांना वडेट्टीवार यांनी ग्वाही दिली. पूरग्रस्तांना मदतीचे वाटप करतांना कोणताही दुजाभाव केला जाणार नाही. अतिशय सुक्ष्म स्वरुपात लोकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून केले जातील. पूरग्रस्तांनी मदतीबाबत चिंता करु नये असे ते म्हणाले. मदत वेळेत आणि प्रत्येक पूरग्रस्ताला कशी मिळेल ही आमची जबाबदारी आहे. आता तुम्ही फक्त तुमच्या आरोग्याची काळजी घ्या असे त्यांनी गावकऱ्यांशी बोलतांना गावागावत मार्गदर्शन केले. पूरस्थितीमुळे नुकसान भरपाई देण्यात येईल. त्यामुळे प्रत्येकाने त्याची काळजी न करता आरोग्याची काळजी करा असे मंत्री महोदयांनी सांगितले. पूरस्थितीची पाहणी करताना जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, प्रभारी जिल्हाधिकारी आनंद वालस्कर, आरमोरी तहसीलदार दाहट, उपविभागीय आधिकारी विवेक मेश्राम तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.