Published On : Mon, May 11th, 2020

‘त्यांना’ हिणवू नका, ‘त्यांच्या’ कुटुंबाला आधार द्या…!

महापौर संदीप जोशी यांनी केले भावनिक आवाहन

नागपूर : कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे नागपूरसह संपूर्ण देश महासंकटातून जातोय. या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तींना जर या रोगाने ग्रासले तर त्यांच्या कुटुंबियांना हीन वागणूक देऊ नका. कारण आपल्याला सुरक्षित करण्यासाठी त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. त्यांच्या कुटुंबियांना आधार द्या, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी हे आवाहन केले आहे. नागपुरात कोव्हिडची साखळी खंडित करण्यासाठी आणि बाधित रुग्णांवर उपचार करून पूर्णतः बरे करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती दिवसरात्र राबत आहेत. नागरिकांनी शिस्त पाळावी यासाठी पोलिस अधिकारी, कर्मचारी कडक उन्हात बंदोबस्तात आहेत. स्वच्छता कर्मचारी या संकटकाळात पुन्हा रोगराई पसरू नये म्हणून शहर स्वच्छ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

कर्तव्यावर असणाऱ्या यातील काही व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या युद्धात गेल्या दीड महिन्यापासून कुटुंबापासून दूर राहणाऱ्या त्या व्यक्तींने नागपूर सुरक्षित राहावे म्हणून आपला जीव धोक्यात घातला तो व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या कुटुंबाला हीन दर्जाची वागणूक मिळत असल्याचे प्रकरण समोर आले. ही बाब अत्यंत गंभीर आहे.

फ्रंटवर लढणाऱ्या या सर्वांनी जर म्हटले आम्हाला बरे वाटत नाही. आम्ही कर्तव्यावर जाणार नाही, तर या शहराची परिस्थिती काय असेल, याचा जरा विचार करा, असे म्हणत ‘विचार करा, मानसिकता बदला. तो आपल्यासाठी देवदूत बनला. आता त्याच्या कुटुंबाचा आधार बना’, असे भावनिक आवाहन महापौर संदीप जोशी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.