Published On : Sat, Oct 17th, 2020

लसीवर विसंबून राहू नका, स्वत:ची काळजी स्वत: घ्या!

Advertisement

कोव्हिड संवादमध्ये डॉक्टरांचे आवाहन : मनपा-आयएमएचे आयोजन

नागपूर : कोरोनावर सध्यातरी लस उपलब्ध नाही. ती कधी येईल सांगता येत नाही. त्यामुळे लसीवर विसंबून राहू नका. स्वत:वर निर्भर राहा. स्वत:ची काळजी स्वत: घ्या, असे आवाहन सेव्हन स्टार हॉस्पीटलचे संचालक डॉ. सदाशिव भोळे आणि डॉ. प्रशांत राहाटे यांनी केले.

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोव्हिड संवाद या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात ते बोलत होते. ‘कोव्हिड रुग्णांवर शस्त्रक्रिया करताना येणाऱ्या अडचणी’ या विषयावर दोन्ही तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. शस्त्रक्रिया जर कोव्हिड रुग्णांवरची असेल तर ती करताना डॉक्टरांना बरीच काळजी घ्यावी लागते. कुठलीही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी आर.टी.पीसीआर टेस्ट केली तर रुग्णांना आणि डॉक्टरांना काळजी घेणे सुलभ जाते. इतर रुग्णांना संसर्ग होऊ नये म्हणून या शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरचे सर्व प्रोटोकॉल पाळणे आवश्यक आहे. कोव्हिड असो किंवा नसो, नागपूर शहरात आता कुठलीही शस्त्रक्रिया सुलभ झाली आहे. सध्याचा काळ कोव्हिडचा काळ आहे. त्यामुळे खूपच आवश्यक असेल तरच शस्त्रक्रिया करावी अन्यथा रुग्ण कोव्हिडमधून बरा झाल्यावर अथवा १४ दिवसांनी करावी.

डॉ. प्रशांत राहाटे म्हणाले, कोव्हिड रुग्णांवर उपचार करताना फ्रंट लाईनवर कार्य करणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी पीपीई कीट घालून असतात. सहा ते आठ तास पीपीई कीट घालून राहणे हे एक दिव्यच आहे. अनेक अडचणी असतानाही हे सर्व योद्धा कोव्हिड रुग्णांना सेवा देत आहे, याचा आम्ही सार्थ अभिमान बाळगायला हवा, असे त्यांनी सांगितले.

डॉ. सदाशिव भोळे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने शरीरात पाण्याची मुबलक मात्रा घेतली पाहिजे. शरीरात पाणी कमी राहिले तर त्याचा रिकव्हरीवरही परिणाम होऊ शकतो. हळूहळू भोजन वाढवावे. जर रुग्णाने पूर्वी कुठलाही व्यायाम केला नसेल तर एकदम व्यायामाला सुरुवात करु नये. त्याचा त्रास होऊ शकतो. श्वासोच्छश्वासाचे सत्र करु शकतात. रुग्णांनी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पूर्णत: औषधांकडे लक्ष द्यावे. कोव्हिडवर डॉक्टर उपचार करतच आहेत. मात्र, कोव्हिडचे संक्रमण पूर्णपणे थांबविणे हे समाजाच्या हातात आहे. प्रभाव कमी होत आहे अथवा शासनाने अनलॉक केले म्हणून आपण नियमांचे उल्लंघन करून वागणे योग्य नाही. शासनाचे दिशानिर्देश आणि मनपाने आखून दिलेल्या नियमांचे पालन योग्यरीत्या करणे हे आपले कर्तव्य आहे. जर हे कर्तव्य आपण प्रामाणिकपणे बजावले तर कोव्हिडचे संक्रमण निश्चितच थांबविता येणे शक्य आहे, असा विश्वास डॉ, सदाशिव भोळे यांनी दिला. यावेळी डॉक्टरद्वयींनी शहीद झालेल्या कोरोना योद्धांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रारंभी सोहम फाऊंडेशनचे संजय अवचट यांनी डॉक्टरद्वयींचा परिचय करून देत आयोजनाबद्दलची माहिती दिली.

शनिवारी समारोप
नागरिकांच्या मनातील भीती जावी आणि शंकांचे निरसन व्हावे या उद्देशातून ९ सप्टेंबर रोजी महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड संवाद फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे आतापर्यंत २९ भाग झालेत. शनिवार १७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ३० वा भाग असून हा समारोपीय भाग राहणार आहे. यामध्ये आय.एम.ए.च्या अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी, डॉ. राजेश स्वर्णकार, डॉ. सुनिता लवांगे ‘नवे दैनंदिन आयुष्य’ या विषयावर मार्गदर्शन करतील. दुपारी २.४५ वाजता समारोप होणार असून महापौर संदीप जोशी यावेळी उपस्थित राहतील. समस्त नागपूरकरांनी यावेळी मनपाच्या अधिकृत फेसबुक पेजवर कनेक्ट व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.