
नवी दिल्ली : घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ झाल्यानंतर काँग्रेसने केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर मोठा आर्थिक ताण पडत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकाअर्जुन खरगे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरवाढीमुळे सामान्य कुटुंबांचे स्वयंपाकघराचे बजेट अधिकच कोलमडले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी असताना त्याचा फायदा नागरिकांना दिला गेला नाही आणि आता दर वाढवून लोकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा टाकण्यात आला आहे.
खरगे यांनी असेही आरोप केले की, जागतिक स्तरावर सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार तेल, गॅस आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरले आहे. महागाई नियंत्रणात आणण्याऐवजी सरकार सातत्याने दरवाढ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरूनही या निर्णयावर टीका करण्यात आली. पक्षाने म्हटले आहे की, घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर थेट ६० रुपयांनी वाढवण्यात आले आहेत, तर व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत सुमारे ११५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसह लघु व्यावसायिकांनाही मोठा फटका बसणार आहे.
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ही वाढ केली आहे. Indian Oil Corporation च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, दिल्लीत १४.२ किलो वजनाच्या घरगुती (नॉन-सब्सिडी) एलपीजी सिलेंडरची किंमत आता ९१३ रुपये झाली असून यापूर्वी ती ८५३ रुपये होती.
गेल्या वर्षभरात एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ही दुसरी वाढ असून देशभरात स्वयंपाक गॅसच्या वाढत्या दरांवरून राजकीय वाद अधिक तीव्र झाला आहे.








