
नागपूर : कठोर परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर नागपूरमधील दोन तरुणांनी प्रतिष्ठेच्या UPSC परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत शहराचा मान उंचावला आहे. प्रज्ज्वल नसरे आणि भाग्यश्री नाईकेले या दोघांनीही आपल्या मेहनतीच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले.
नागपूर केंद्रातील प्रज्ज्वल नसरे याने UPSC परीक्षेत ६७७ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील ठाणेगाव या छोट्याशा गावातील प्रज्ज्वल हा शेतकरी कुटुंबातून आलेला आहे. त्याचे वडील धनराज नसरे हे लहान जमीनधारक शेतकरी आहेत.
प्रज्ज्वलने २०२३ मध्ये पदवी (बीए) पूर्ण केली, तर २०२५ मध्ये राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर (एमए) शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने प्रशासकीय सेवेसाठी तयारी सुरू केली. तिसऱ्या प्रयत्नात त्याला यश मिळाले. याआधी दुसऱ्या प्रयत्नात तो मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीपर्यंत पोहोचला होता; मात्र अंतिम निवड थोडक्यात हुकली होती. विशेष म्हणजे, त्याने कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार न घेता ऑनलाइन मार्गदर्शन आणि स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले.
दरम्यान, नागपूरमधील दिघोरी परिसरातील रहिवासी भाग्यश्री नाईकेले हिनेही UPSC परीक्षेत पुन्हा एकदा यश मिळवत आपली क्षमता सिद्ध केली आहे. तिचे वडील राजेश नाईकेले हे व्यवसायाने इलेक्ट्रिशियन आहेत. साध्या कुटुंबातून आलेल्या भाग्यश्रीने प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत त्यासाठी सातत्याने मेहनत घेतली.
बीएससी पूर्ण केल्यानंतर तिने पूर्णवेळ UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. कोणतेही विशेष कोचिंग न घेता तिने मागील वर्षी UPSC परीक्षेत ७३७ वा क्रमांक मिळवत Indian Railway Management Service (IRMS) मध्ये निवड मिळवली. सध्या ती हैदराबाद येथे प्रशिक्षण घेत आहे.
प्रशिक्षणादरम्यानही तिने पुन्हा परीक्षा देत आपला क्रमांक सुधारण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी तिने ६४७ वा क्रमांक मिळवत आणखी मोठे यश संपादन केले. त्यांच्या या कामगिरीमुळे नागपूरसह संपूर्ण विदर्भात त्यांचे कौतुक होत आहे.








