Published On : Mon, Sep 28th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात पाच वर्षांत 44,660 जणांना कुत्र्यांचा चावा; रेबीजने 8 जणांचा मृत्यू

नसबंदीच्या मोहिमेनंतरही कुत्र्यांच्या हल्ल्यांचे सत्र सुरू; 9,946 नागरिक गंभीर जखमी
Advertisement

नागपुरात पाच वर्षांत 44,660 जणांना कुत्र्यांचा चावा; रेबीजने 8 जणांचा मृत्यू

नागपूर : उपराजधानीत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, 2021 ते 2025 या पाच वर्षांत तब्बल 44 हजार 660 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे मनपाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. यापैकी 9 हजार 946 नागरिक गंभीर जखमी झाले, तर याच कालावधीत रेबीजमुळे 8 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. 28 सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या जागतिक रेबीज दिनाच्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी नागपुरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येकडे लक्ष वेधणारी आहे.

आकडेवारीनुसार, 2021 मध्ये कुत्र्यांच्या चाव्याच्या 5,800 घटना नोंदल्या गेल्या आणि 1,484 जण गंभीर जखमी झाले. 2022 मध्ये हे प्रमाण वाढून 8,317 वर पोहोचले, तर 2,134 जण गंभीर जखमी झाले. 2023 मध्ये 9,110 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आणि 1,877 जण गंभीर जखमी झाले. 2024 मध्ये 9,429 घटना घडल्या असून 1,841 नागरिक गंभीर जखमी झाले.

Gold Rate
Sept 28,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 49,200 /-
Gold 22 KT ₹ 1,38,500 /-
Silver/Kg ₹ 2,25,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विशेष म्हणजे, 2025 मध्ये परिस्थिती आणखी गंभीर झाल्याचे दिसून येते. या वर्षात तब्बल 10,944 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला, तर 2,173 जण गंभीर जखमी झाले. म्हणजेच पाच वर्षांच्या कालावधीत 2025 मध्ये सर्वाधिक कुत्र्यांच्या चाव्याच्या घटना नोंदल्या गेल्या.

भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी मनपाकडून नसबंदी मोहीम राबविण्यात येत आहे. गेल्या पाच वर्षांत तीन संस्थांच्या माध्यमातून 69 हजार 386 कुत्र्यांची नसबंदी करण्यात आल्याचे मनपाने सांगितले आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर नसबंदी झाल्यानंतरही कुत्र्यांच्या हल्ल्यांची संख्या कमी होत नसल्याने भटक्या कुत्र्यांचे व्यवस्थापन आणि नसबंदी मोहिमेच्या परिणामकारकतेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement

दरम्यान, शहरात केवळ कुत्र्यांचेच हल्ले नागरिकांसाठी चिंतेचा विषय नाहीत. बंदरे, गाढवे आणि डुकरांच्या हल्ल्यांमध्येही 6 हजार 126 नागरिक जखमी झाल्याची माहिती मनपाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. या नागरिकांवर मनपाच्या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले.

जागतिक रेबीज दिनानिमित्त 28 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांमध्ये कुत्र्यांचे मोफत रेबीज लसीकरण करण्यात येणार आहे. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नितीन फुके यांनी नागरिकांना रेबीजपासून बचावासाठी वेळेवर लसीकरण आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.