Published On : Mon, Mar 30th, 2020

खोकला-सर्दी-तापाचे रुग्ण तपासतांना डॉक्टरांनी प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी

– आयएमए आणि विदर्भ हॉस्पिटल्स असोसिएशनचे संयुक्त निवेदन
– खासगी डॉक्टर व परिचारिकांना मिळावे विम्याचे कवच

नागपूर: कोरोना व्हायरसच्या आपतकालीन परिस्थितीदरम्यान देशातील केंद्र व राज्य सरकारे, खासगी वैद्यकीय सेवा पुरविणार्‍या संस्था, शासकीय अधिकारी, पोलिसदल, जीवनावश्यक वस्तु पुरवठा करणार्‍या साखळीतील लोकं आणि एकूणच जनता समाजात कोरोना पसरू नये म्हणून परिश्रम घेत आहेत. अशा प्रसंगी सर्व खासगी डॉक्टरांना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूर शाखेने आणि विदर्भ हॉस्पिटल्स असोसिएशन यांनी संयुक्त निवेदनाद्वारे आवाहन केले की, त्यांनी आपतकालीन वैद्यकीय सेवा सुरळीत सुरू ठेवाव्यात.

तसेच ज्या रुग्णांना खोकला, ताप, श्‍वास घेण्यास अडचण आहे; अशा रुग्णांची तपासणी करताना डॉक्टरांनी देखील प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी. त्याच प्रकारे या रुग्णांवर उपचार करताना पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (पीपीई-कोरोनापासून बचाव करण्यासाठी वापरण्याचा पोषाख) घालण्यास प्राधान्य द्यावे आणि अशा रुग्णांची कोरोना निदान चाचणी करवून घेण्यास प्राधान्य द्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

आयएमए व विदर्भ हॉस्पिटल्स असोसिएशनने अशा प्रकारे रुग्ण तपासणार्‍या डॉक्टरांना देखील तातडीने पीपीई किट पुरविण्याची तसेच सरकारी डॉक्टरांसारखे विम्याचे कवच देण्याची विनंती राज्य सरकारला तसेच विभागीय आयुक्तांकडे केली आहे. व्हीएचए व आयएमएने कोरोना व्यवस्थासाठी सरकारी रुग्णालयांना आवश्यक असलेले व्हेंटिलेटर्स, बेड्स आणि अन्य साधणे पुरविणार्‍या खासगी रुग्णालयांची यादी दिली आहे.

त्याच प्रकारे सरकारी रुग्णालयातील कोरोना बाधित नसलेल्या रुग्णांना आपल्या इस्पितळात काही बेड आरक्षित करण्याची तयारी देखील खासगी रुग्णालयांनी दर्शवली आहे. तसेच खासगी विशेषज्ञ डॉक्टर्स देखील सरकारी व्यवस्थेतील डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल कर्मचार्‍यांना कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी देण्यात येणार्‍या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होत आहेत.

हे संयुक्त निवेदन विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक अरबट आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला यांनी सादर केले आहे.