Published On : Wed, Jul 8th, 2020

नागपुरातील एलेक्सिस रुग्णालयात गोंधळ घालत टोळक्याची डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी

Advertisement

नागपूर : महिलेचा इको चाचणीचा रिपोर्ट दिला नसल्याचं कारण सांगत नागपुरातील सुप्रसिद्ध एलेक्सिस रुग्णालयात पाच ते सहा जणांना गोंधळ घातला होता. यावेळी तिथे उपस्थित डॉक्टर्सला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी साहिल सय्यद नावाचा सामाजिक कार्यकर्ता आणि इतर 5 जणांवर मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सय्यद आणि त्याच्या सहकाऱ्यांवर आरोप आहे की 4 जुलै रोजी त्यांनी एलेक्सिस रुग्णालयात जाऊन डॉक्टर्सला दमदाटी केली आणि रुग्णालयात बुलडोझर आणून रुग्णालयाची भिंत पाडण्याची धमकी दिली. गोंधळ घालणाऱ्यांचा दावा होता की एलेक्सिस रुग्णालयाने एका महिलेचा इको चाचणीचा रिपोर्ट तिला दिलेला नाही. तर संबंधित महिलेची इको चाचणी काही कारणास्तव झालीच नसल्याने तिचे रिपोर्ट देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे रुग्णालयाचे म्हणणे होते. याच मुद्द्यावरून त्यांच्यातील वाद वाढत जाऊन गोंधळ घालणाऱ्या टोळक्याने डॉक्टर्सला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा रुग्णालयाचा आरोप आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद
रुग्णालयाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करत या प्रकरणी सय्यद आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान हे सर्व जण फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. विशेष बाब म्हणजे हा गोंधळ सुरू असताना महापालिकेचे अधिकारीही तिथे पोहोचले होते. त्यांनी ही रुग्णालयावर दबाव आणल्याचा आरोप होतय. मात्र, त्यासंदर्भात एलेक्सिस रुग्णालयाने कोणतीही तक्रार पोलीस किंवा महापालिका प्रशासनाकडे दिलेली नाही.

तशी तक्रार आल्यास तिथे उपस्थित महापालिकेचे अधिकाऱ्यांचे या गोंधळाशी संबंध आहे का? याची चौकशी केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र, ज्या अर्थी रुग्णालयात इतर अनेक रुग्ण असताना हे गोंधळ घालण्यात आले हे अत्यंत गंभीर असून पोलिसांनी रुग्णलयातील सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात रुग्णालय प्रशासनाला काही सूचना केला आहेत, अशी माहिती झोन 2 च्या डीसीपी विनिता शाहू यांनी दिली आहे. लवकरच आरोपीना अटक केले जाईल, अशी माहितीही डीसीपी शाहू यांनी दिली आहे.