Published On : Thu, Nov 23rd, 2017

बीनाचे पुनर्वसन आधी करा : पालकमंत्री बावनकुळे

Advertisement


नागपूर: जिल्ह्यातील पिपळा कोळसा खाण वेकोलिने खाणीत कोळसा असूनही बंद केली आहे, तर वलनी खाण गेल्या 17 वर्षापासून बंद आहे. तसेच कामठी तालुक्यातील बीना या गावाचे पुनवर्सन अजूनही करण्यात आले नाही. खाणीचे काम मात्र सुरु आहे. वेकोलिने आधी बीना गावाचे पुनर्वसन करावे, नंतरच काम सुरु ठेवावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज वेकोलिच्या अधिकार्‍यांना दिले.

बिजलीनगर विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीत आ. सुनील केदार व वेकोलिचे अधिकारी उपस्थित होते. पिपळा या खाणीत कोळसा असूनही वेकोलिने ही खाण बंद केली आहे. उत्पादन खर्चासाठी ही खाण परवडत नसल्यामुळे बंद करण्यात आल्याची माहिती या प्रसंगी सांगण्यात आली. तसेच वलनी ही खाण सन 2000 पासूनच बंद आहे. कोळसा काढताना पाण्याची अडचण निर्माण होत असल्यामुळे ही खाण बंद आहे. या खाणीतही कोळसा आहे. नवीन तांत्रिक पध्दतीने या खाणीतून वेकोलिने कोळसा काढला पाहिजे, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली.

बीनाचे पुनर्वसन करताना ज्यांची शेती व घर वेकोलिने घेतले त्यांच्यासाठी 1500 चौ. फूट, ज्यांचे फक्त घर खाण प्रकल्पात गेले त्यांच्यासाठी 1200 चौ. फूट, तर जे सरकारी जागेवर बसले आहेत, त्यांच्यासासठी 700 चौ. फुटाचे घर असा आराखडा तयार करण्याच्या सूचना पालकमंंत्री बावनकुळे यांनी संबंधित अधिकार्‍यांना केल्या.

नागपूर जिल्हा आणि शहरातील संरक्षण विभागाच्या जागा महाराष्ट्र शासनाला हस्तांतरित करण्याप्रकरणी 3 टप्प्यात या जागा हस्तांतरित करण्यात यावा असा पर्याय या बैठकीत समोर आला. याप्रसंगी कामठी कॅन्टॉनमेंटचे ब्रिगेडियर आणि जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते.

कामठी शहरात म्हाडाचे पैसे 2003 मध्ये भरून अजूनही घरे उपलब्ध झाले नाही, या तक्रारीवर पालकमंत्र्यांनी विणकर समाज आणि बिडी कामगारांसाठी घरे बांधण्याची सूचना म्हाडाला केली. म्हाडातर्फे 888 घरे बांधण्यात येणार आहे. या घरकुलांसाठी जुन्या विकास आराखड्यानुसार इमारत आराखडा मंजूर करण्याचे निर्देश न.प.ला दिले.

तसेच कामठी प्रगात 9 इस्माईलपुरा येथे व अशोकनगर येथे 15 दिवसात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

नावीण्यपूर्ण योजनेतून कामठी तालुका बॉक्सींग प्रशिक्षण केंद्र कामठी येथे खेळाचे दर्जेदार साहित्य खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.


शहीद गोवारी स्मृतिदिन
23 व्या आदिवासी शहीद गोवारी स्मृतिदिनानिमित्त आज गुरुवारी सकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी झिरो माईल आदिवासी गोवारी शहीद स्मारक येथे जाऊन शहीद गोवारींना अभिवादन केले.