Published On : Thu, Apr 9th, 2020

मिरवणूका काढू नका भीमजयंतीला घरीच संविधान वाचन करा

नागपूर: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक अंतर राखण्याची आज खरी गरज आहे. ही गरज ओळखून गर्दी टाळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतिनिमित्त मिरवणुका काढू नका, घरीच बसून राष्ट्राचा प्राण असलेल्या संविधानाचे वाचन करा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय धम्मगुरू तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी आंबेडकरी अनुयायांना केले आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला १३ एप्रिल रोजी मिरवणूक काढण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. रात्री १२ च्या ठोक्याला उपराजधानीतून निघणाèया सर्व मिरवणुका संविधान चौकात येतात आणि जल्लोष करतात. या मिरवणुकीत अनुयायी येतात. त्यामुळे दिवसभर संविधान चौक, दीक्षाभूमी फुललेली असते. यंदा अवघ्या जगावर कोरोना संसर्गाचे संकट असून, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवूनच कोरोनाला मूठमाती द्यायची आहे. उत्सवानिमित्त जमावामुळे अखंड समाजाची प्रतिमा मलीन होऊ नये, याचीही खबरदारी घेण्याची गरज आहे.

सध्या भारतासह जगभरातील दोनशेवर देशात कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरक्षित अंतर हाच एकमेव उपाय आहे. या पाश्र्वभूमीवर देशात टाळेबंद करण्यात आला आहे. अशातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत्या १४ एप्रिल रोजी येत आहे. १३ एप्रिल रोजी रात्री शहरातील शेकडो बुद्धविहारांतून मिरवणुका काढल्या जातात. शहराच्या चारही भागातील या मिरवणुका संविधान चौकात एकत्र येतात. हजारो अनुयायी रात्री १२ च्या ठोक्याला फटाक्यांची आतषबाजी व निळाईची उधळण करीत जयंतीचा जल्लोष करतात. यानिमित्त आंबेडकरी अनुयायांनी उपराजधानीतील रस्ते फुलून जातात. काही ठिकाणी भोजनदान, शीतपेये आणि खाद्य पदार्थांचे वितरणही केले जाते. यंदा मात्र कोरोना संसर्गामुळे देशावर संकट आले आहे.

या संकटाला मूठमाती देण्यासाठी आंबेडकरी अनुयायांना खबरदारी घ्यायची आहे. महामानवाच्या जयंतीला कोणीही मिरवणूक काढू नये, शहरातील सर्व बुद्धविहार कमेटीच्या पदाधिकाèयांनी याची खबरदारी घ्यावी. वस्त्या वस्त्यांमध्ये समूहाने जयंती साजरी करू नका, घरच्या घरीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेसमोर त्रिशरण व पंचशील ग्रहण करावे, घराबाहेर पडू नये, असे कळकळीचे आवाहन धम्मगुरू ससाई यांनी केले आहे. विद्याथ्र्यांनी अभ्यास करावा तसेच बाबासाहेबांच्या विचारांची कास धरावी, त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालल्यास हीच खरी जयंती ठरेल, असेही ससाई म्हणाले.