Published On : Thu, Mar 18th, 2021

गृहविलगिकरणात असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना Tablet Fevipiravir देऊ नका

Advertisement

टास्क फोर्स समितीच्या बैठकीत मनपा आरोग्य विभागाचा निर्णय

नागपूर : गृहविलगिकरणात असलेले पॉझिटिव्ह रुग्ण ज्यांना लक्षणे नाहीत किंवा सौम्य प्रकारची लक्षणे आहेत अशा रुग्णांना Tablet Fevipiravir देण्यात येऊ नये, असे निर्देश मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे देण्यात आले आहे. अलिकडेच मनपा मुख्यालयातील कोरोना वॉर रूममध्ये नुकतीच टास्क फोर्स समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गृहविलगिकरणात असलेल्या रुग्णांना देण्यात येत असलेल्या औषधांच्या बाबत शासनाच्या दिशानिर्देशांचे व मार्गदर्शक सूचनांची पुरेपुर अमंलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते.

या निर्देशानुसार मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी याबाबतच्या लेखी सूचना सर्व आरोग्य अधिकारी, झोनल वैद्यकिय अधिकारी, आर.आर.टी. टीम तसेच सदस्यांना दिल्या आहेत.

कोरोना विषाणु प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत नागपूर महानगरपालिका झोन स्तरावर आर.आर.टी. टीमद्वारे गृहविलगिकरणात असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना औषधोपचार पुरविल्या जाते. मात्र राज्य शासनाच्या २२.७.२०२० रोजीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये गृहविलगिकरणात असलेले पॉझिटिव्ह रुग्ण ज्यांना लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत अशांना Tablet Fevipiravir द्यावे अशा सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे महापौर व मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार मनपाच्या आरोग्य विभागातर्फे सर्व झोनल वैद्यकिय अधिकारी, आर.आर.टी. टीम तसेच सदस्यांनी गृहविलगिकरणात असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाला Tablet Fevipiravir देऊ नका असे आवाहन करण्यात आले आहे.