Published On : Wed, Dec 29th, 2021

मनपाच्या इयत्ता ८ ते १०च्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणार टॅब

Advertisement

शिक्षण विशेष समितीच्या बैठकीत ठराव पारित

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे मनपाच्या शाळेत शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. जे दिव्यांग विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाईन शिक्षण घेता यावे यासाठी इयत्ता आठवी ते दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मनपातर्फे टॅब देण्यात येणार आहेत. असा ठराव मंगळवारी (ता.२८) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिक्षण विशेष समितीच्या बैठकीत पारित करण्यात आला.

यावेळी शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांच्यासह सदस्या संगीत गि-हे, सदस्य मोहम्मद इब्राहिम तौफिक अहमद मनपाच्या शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, सहायक शिक्षणाधिकारी राजेंद्र सुके, सुभाष उपासे, संजय दिघोरे तसेच सर्व शाळा निरीक्षण उपस्थित होते.

बैठकीत शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांनी शहरात सुरु असलेल्या सहाही इंग्रजी माध्यम शाळांच्या प्रवेश स्थितीबाबत, या शाळांच्या इमारतीच्या दुरुस्तीबाबत, विद्यार्थ्यांना गणवेश, सुपर-७५ विद्यार्थ्यांना लॅपटॉप तसेच इयत्ता १०व्या वर्गाचा निकाल वाढविण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेतला. तसेच मनपाच्या प्रत्येक शाळेत एक डिजिटल वर्ग तयार करणे, सोमलवार शाळेच्या धर्तीवर इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना प्रयोगातून शिकता यावे यासाठी स्टेन सर्व्हिस प्रा.लि. कडून शैक्षणिक साहित्य महापौर निधीतून घेण्यात यावेत, हे ठराव यावेळी पारित करण्यात आले.

मनपाच्या इंग्रजी शाळा उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर शहरात मनपाच्या सहा विधानसभा क्षेत्रात सहा इंग्रजी शाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत. या सहाही इंग्रजी शाळांना पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या शाळांमधील प्रवेश पूर्ण झाले असल्याची माहिती मनपा शिक्षणाधिरी प्रीति मिश्रीकोटकर यांनी यावेळी दिली. पुढे त्यांनी सांगितले की, या सहाही इंग्रजी शाळांमध्ये एकूण ४८० विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट होते. मात्र उल्लेखनीय बाब ही आहे की, यामध्ये केजी-१ आणि केजी-२ च्या वर्गात एकूण ५५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश जास्त झाल्यामुळे या शाळांमध्ये केजी-१ आणि केजी-२चे दोन-दोन वर्ग सुरु केले जाणार असल्याचेही मनपा शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.

मनपाच्या ७ शाळेत अद्ययावत वैज्ञानिक प्रयोग लॅब तयार
मनपाच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी कोणत्याही विषयात मागे राहू नये यासाठी मनपा सतत प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यांना प्रत्येक शैक्षणिक साहित्य तसेच भौतिक सुविधा पुरवत असते. आता विद्यार्थ्यांसाठी लवकरच अद्ययावत वैज्ञानिक प्रयोग लॅब सुरु केली जाणार आहे, अशी माहिती शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी यावेळी दिली. पुढे ते म्हणाले, ज्येष्ठ नगरसेवक आमदार प्रवीण दटके यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या ७० लाखाच्या अनुदानातून मनपाच्या ७ शाळांमध्ये अद्ययावत प्रयोग लॅब तयार करण्यात आलेल्या आहेत. या सर्व लॅब तयार झाल्या असून नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात येणार आहेत. सोमवारी (ता.२७) स्वतः या लॅबची पाहणी केली असल्याचेही यावेळी शिक्षण सभापतींनी सांगितले.

सध्या मनपा शाळांच्या विज्ञान विषयाच्या शिक्षकांना या लॅबमध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामुळे मनपाचे विद्यार्थीसुद्धा अभ्यासक्रमातील जवळपास २०० प्रयोग ते स्वतः करू शकणार आहेत. यावेळी शिक्षण समितीने आमदार प्रवीण दटके यांचे आभार मानले.

लॅब तयार करण्यात आलेल्या शाळा

१. लाल बहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळा

२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी माध्यमिक शाळा

३. एम.ए.के. आझाद उर्दू माध्यमिक शाळा

४. दुर्गानगर मराठी माध्यमिक शाळा

५. जी.एम. बनातवाला इंग्रजी माध्यमिक शाळा

६. राममनोहर लोहिया हिंदी माध्यमिक शाळा

७. संजयनगर हिंदी माध्यमिक शाळा

इयत्ता दहावीचा निकाल वाढविण्यावर भर द्या
मनपाचे विद्यार्थी कुठेही मागे नाहीत. त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास ते सुद्धा प्राविण्य श्रेणीत येऊ शकतात हे मागील दोन वर्षात मनपाच्या विद्यार्थ्यांनी करून दाखविले. शहरातील नागरिकांचा मनपा शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळे यावर्षी जास्तीत जास्त विद्यार्थी मेरिटमध्ये कसे येतील यासाठी विशेष प्रयत्न करा, असे निर्देश शिक्षण समिती सभापती यांनी यावेळी दिले. या विद्यार्थ्यांना लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य पुरविण्यात यावे. त्यांना कुठल्याही साहित्याची कमी पडू देऊ नका. अभ्यासात कमकुवत विद्यार्थ्यांना ओळखून त्यांना त्या-त्या विषयाचे वेगळे प्रशिक्षण द्या, अशा सूचनाही यावेळी सभापतींनी केल्या. दहावीचा निकाल वाढविण्याची संपूर्ण जबाबदारी शाळा निरीक्षकांनी घेऊन त्यांनी स्वतः याकडे लक्ष द्यावे असेही ते म्हणाले.

दहावीचा निकाल वाढविण्यासाठी विशेष प्रशिक्षण
कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी मनपा शाळांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन वर्ग सुरु होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मनपाचे शिक्षक प्रयत्नशील होते. आता इयत्ता दहावीचा निकाल वाढविण्यासाठी दोन खासगी संस्थांच्या मदतीने त्यांना प्रत्येक रविवारी अभ्यासात अडचण येत असलेल्या विषयाबद्दल विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे, अशी माहिती मनपा शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर यांनी यावेळी दिली. ‘मासूम’ संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कसे करावे याबद्दल गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयाच्या शिक्षकांची कार्यशाळा घेऊन माहिती देण्यात येत आहे. तर शहरात ६ केंद्रात विद्यार्थ्यांना प्रत्येक रविवारी बोलावून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.

नवीन वर्षात विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश
राज्य शासनाच्या निर्देशानुसार मनपा क्षेत्रातील शाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत. मनपा शाळेत एकूण १२,६०३ विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात गणवेश मिळतील असे मनपा शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर यांनी यावेळी सांगितले.