नागपूर : भारतीय बुद्धिबळाला अभिमानास्पद यश मिळालं आहे. नागपूरची युवा आणि तडफदार बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने रविवारी 2025 फिडे महिला शतरंज विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. अनुभवी कोनेरू हम्पीचा पराभव करत दिव्याने केवळ स्पर्धा जिंकली नाही, तर भारताच्या चौथ्या महिला ग्रँडमास्टर आणि एकूण ८८व्या ग्रँडमास्टर बनण्याचा मानही पटकावला.
अंतिम सामना : संतुलित सुरुवात, निर्णायक शेवट-
या अंतिम सामन्यात अनुभवी हम्पी आणि तरुण दिव्या यांच्यात बुद्धिबळाची खऱ्या अर्थाने कसोटी पाहायला मिळाली. पहिला क्लासिकल सामना ४१ चालींनंतर बरोबरीत सुटला. दुसऱ्या क्लासिकल सामन्यातही दिव्याने हम्पीला ३४ चालींमध्ये रोखून धरत सामना टायब्रेकमध्ये नेला.
टायब्रेकमध्ये दिव्याची चलाखी-
टायब्रेक सामन्यात वेग आणि संयम यांची खरी कसोटी होती. पहिल्या टायब्रेक गेममध्ये दिव्याने पेत्रोव्ह डिफेन्स खेळत हम्पीला बरोबरीत रोखलं. दुसऱ्या गेममध्ये हम्पीने क्वीन्स गॅम्बिट डिक्लाइन्ड – कॅटलन व्हेरिएशन वापरलं, मात्र दिव्याने शांत, शिस्तबद्ध आणि परिपक्व खेळ करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. हम्पीच्या एका चुकीचा पुरेपूर फायदा घेत दिव्याने सामना आपल्या बाजूने खेचून आणला.
भावनिक क्षण : अश्रूंमध्ये लपलेला संघर्ष-
विजयानंतर दिव्याच्या डोळ्यांत अश्रू आले. हे अश्रू फक्त आनंदाचे नव्हते, तर त्या प्रवासाचे, मेहनतीचे आणि आत्मविश्वासाचे प्रतीक होते, ज्यामुळे ती आज या उंचीवर पोहोचली.
भारतासाठी अभिमानाचा क्षण-
या यशासह दिव्या देशमुख भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर ठरली असून एकूण ८८वी ग्रँडमास्टर होण्याचा बहुमान तिला मिळाला आहे. विशेष म्हणजे, महिला विश्वचषक जिंकणारी आणि ट्रिपल क्राउन मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.ही केवळ वैयक्तिक नव्हे, तर संपूर्ण देशासाठी गौरवाची बाब आहे. दिव्याच्या या यशामुळे अनेक नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळणार हे निश्चित!