
मुंबई : महाराष्ट्रातील गाजत असलेल्या बोगस शिक्षक नियुक्ती घोटाळ्याच्या तपासाला आता नवी दिशा मिळाली आहे. शालार्थ आयडी घोटाळा आणि बनावट शिक्षक भरती प्रकरणात राज्यभरात दाखल असलेल्या सर्व गुन्ह्यांचा तपास एकत्रितपणे करण्यासाठी नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपविण्यात आला आहे.
सध्या नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५४/२०२५ आणि सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४/२०२५ नोंदविण्यात आले आहेत. या गुन्ह्यांत भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४६५, ४६८, ४०१, ४७२, ४०९, १२०(ब), ३४ तसेच आयटी कायद्याच्या विविध कलमांचा समावेश आहे. याअंतर्गत शालार्थ प्रणालीमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक भरती झाल्याचे उघडकीस आले होते.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नागपूर पोलीस आयुक्तालयाने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून, या पथकाचे नेतृत्व पोलीस उप आयुक्त नित्यानंद झा यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातही संबंधित प्रकरणात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात या घोटाळ्याची व्याप्ती असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
राज्यात एकात्मिक तपास व्हावा यासाठी राज्यातील सर्व संबंधित गुन्ह्यांची जबाबदारी नागपूर SIT कडे देण्यात आली असून, या तपास पथकाला गरजेनुसार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच सर्व संबंधित जिल्ह्यांनी आपल्या कडे असलेल्या गुन्ह्यांची कागदपत्रे SIT कडे त्वरित सुपूर्त करावीत, असे आदेशही यावेळी देण्यात आले आहेत.
हे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक (का.व.सु.) डॉ. मोज कुमार शर्मा यांनी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या मान्यतेने जारी केले आहेत.
या घोटाळ्यातील महत्त्वाचे मुद्दे :
- बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून शिक्षक भरती
- नागपूर व जळगावसह अनेक जिल्ह्यांमध्ये गुन्हे नोंद
- SIT ला राज्यभरातील सर्व प्रकरणांचा तपास करण्याचे अधिकार
- पोलीस उप आयुक्त नित्यानंद झा यांच्याकडे SIT चे नेतृत्व
राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकरणाचा तपास आता अधिक गतीने होणार असल्याची शक्यता आहे.