Published On : Fri, Jul 2nd, 2021

राज्यस्तरीय कृषी पुरस्काराने जिल्ह्याचा नावलौकिक वाढला- भोंडेकर

कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांचा गौरव

भंडारा : जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी राज्य स्तरावर कृषी क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याने पुरस्कार मिळवले आहेत. ही बाब जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी निश्चितच अभिमानास्पद आहे. या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे जिल्ह्याचा नावलौकिक वाढला आहे, असे प्रतिपादन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले.

कृषी विभाग जिल्हा परिषद भंडारा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय भंडाराच्या संयुक्त विद्यमाने स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद सभागृह, भंडारा येथे करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त तसेच सन 2020-21 च्या रब्बी पीक स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या शेतकऱ्यांचा यावेळी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी विनयकुमार मून, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, जिल्हा कृषी अधिक्षक हिंदुराव चव्हाण, कृषी विकास अधिकारी विश्वजीत पाडवी, कृषी उपसंचालक अरुण बलसाने, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, मोहिम अधिकारी व्ही.एम. चौधरी उपस्थित होते.

प्रास्ताविक जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी केले. उद्घाटनप्रसंगी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यासोबतच त्यांनी जिल्हाभरात कृषी विभागाने राबवलेल्या कृषी संजीवनी मोहिमेचे कौतुकही केले. चालू वर्षात जिल्ह्यातील रब्बी हंगाम सन 2020-21 या वर्षात हरभरा पीक स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या शेतकऱ्यांचा आमदार नरेंद्र भोंडेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये चिखली येथील सेंद्रीय शेती कृषीभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी तानाजी गायधने, पीक स्पर्धेतील तालुकास्तरीय विजेत्या महिला शेतकरी मनिषा गायधने तसेच जिल्हास्तरीय रब्बी पीक स्पर्धेतील प्रथम क्रमांकप्राप्त चिखलीचे शेतकरी विष्णुदास हटवार यांच्यासह जनरल व आदिवासी गटातील अन्य यशस्वी शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, भंडारा तालुक्यातील पर्यवेक्षक होमराज धांडे, विजय हुमणे, सिरसीच्या कृषी सहाय्यक रेणुका दराडे, अश्विनी उईके, गिरिधारी मालेवार, उईके, लांजेवार, लिपीक राजगिरे, कृषी मित्र शाम आकरे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. संचालन भंडाराचे मोहिम अधिकारी व्ही.एम. चौधरी यांनी केले तर आभार तंत्र अधिकारी आटे यांनी मानले.