Published On : Fri, Jun 22nd, 2018

वृक्ष लागवड मोहिमेचे झोननिहाय नियोजन करा : वीरेंद्र कुकरेजा

नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्षांची लागवड करण्याच्या मोहिमेअंतर्गत नागपूर महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ५० हजार वृक्षलागवड करायची आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी त्यात नागरिकांचा सहभाग वाढवा. मोहिमेचे नियोजन झोननिहाय करा, असे निर्देश स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.

१ जुलै ते ३१ जुलै दरम्यान राबविण्यात येणाऱ्या वृक्ष लागवड मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (ता. २२) स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्या कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष दिव्या धुरडे, समितीचे सदस्य निशांत गांधी, आशा नेहरू उईके, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, सहायक आयुक्त सर्वश्री विजय हुमणे, प्रकाश वऱ्हाडे, गणेश राठोड, राजेश कराडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार उपस्थित होते.

पुढे बोलताना सभापती वीरेंद्र कुकरेजा म्हणाले, नागपूर महानगरपालिकेच्या शाळा, दहनघाट, उद्याने, धार्मिक स्थळांचा परिसर आदी ठिकाणी वृक्ष लागवडीवर भर देण्यात यावा. एकंदरच झाडे लावल्यानंतर ती जगविण्याची जबाबदारी संबंधित नागरिकांनी घ्यायला हवी. यासाठी या पर्यावरण चळवळीत नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. प्रशासकीय पातळीवर काम करीत असताना नागरिकांनाही अधिकाधिक संख्येने सहभागी करून घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली.

यावेळी उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी वृक्ष लागवडीसंदर्भात सुरू असलेल्या तयारीची माहिती सभापती वीरेंद्र कुकरेजा आणि जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दिव्या धुरडे व सदस्यांना दिली. यात काही सूचना उपस्थित सदस्यांनी केल्या.

१ जुलैला नागपूर महानगरपालिकेच्या वतीने एक मुख्य कार्यक्रम घेण्यात येईल. त्या कार्यक्रमाची तयारी करण्याचे निर्देश सभापतींनी दिले. संपूर्ण मोहिमेच्या तयारीसंदर्भातील अखेरचा आढावा घेण्यासाठी महापौरांच्या उपस्थितीत २९ जून रोजी सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. सदर बैठकीत संबंधित विभागांच्या प्रमुखांना आणि लोकसहभागासाठी पर्यावरणप्रेमींना निमंत्रित करण्याची सूचनाही सभापती कुकरेजा यांनी केली.