नागपूर: नागपूर महानगरपालिका क्षेत्रात १ ते ८ मार्चदरम्यान राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शाळेतील विद्यार्थी आणि शालाबाह्य विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, व्यक्तिला जंताच्या प्रादुर्भावामुळे कुपोषण आणि रक्तक्षय होऊन त्यांना सतत थकवा जाणवतो. त्यांचा शारीरिक वाढ व मानसिक विकास खुंटतो. जंताचा प्रादुर्भाव थांबविणे सोपे आहे. ६ ते १९ वर्षे वयोगटातील शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींनी व १ ते ६ वर्ष वयोगटातील अंगणवाडी, शाळेत न जाणाऱ्या मुलामुलींना समुदाय स्तरावर चावून खावयाच्या जंतनाशक गोळ्या नि:शुल्क दिल्या जातील.
नोंदणी न झालेले आणि शालाबाह्य मुलामुलींना समुदाय स्तरावर जंतनाशक गोळ्या दिल्या जातील. ज्या मुलामुलींना १ मार्चला जंतनाशक गोळी घेता आली नाही, त्यांना ८ मार्च रोजी गोळी द्यावी आणि आपल्या बाळांना स्वस्थ व निरोगी बनविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मनपाच्या माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. वैशाली मोहकर यांनी केले आहे.