Published On : Tue, Jun 15th, 2021

भंडारा: जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुल वितरण

महाआवासचा ई- गृहप्रवेश

भंडारा:- राज्यात 20 नोव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या कालावधीत राबविण्यात आलेल्या महाआवास अभियानातील लाभार्थ्यांना घरकुल वितरणाचा ई-गृहप्रवेश कार्यक्रम आज राज्यभर आयोजित करण्यात आला होता. मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते तर भंडारा येथे जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुलाची चावी वितरित करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुरसंगे व अधिकारी उपस्थित होते.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ग्राम पंचायत खापा येथील हरिदास वानोसा सिडाम, नितेश बळीराम वरकडे, रमाई आवास योजनेअंतर्गत ग्रामपंचायत डोडमाझरी येथील चरण रावजी वंजारी व शबरी आवास योजनेअंतर्गत ग्रामपंचायत खापा येथील उमराव श्रीपत कोळवते यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते घरकुलाची चावी वितरित करण्यात आली.

तसेच पंचायत समिती स्तरावर भंडारा येथे आमदार नरेंद्र भोंडेकर व खंड विकास अधिकारी नूतन सावंत यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व किल्ली देऊन ई गृहप्रवेश करण्यात आला.

ई-गृहप्रवेश चे लाभार्थी खालील प्रमाणे.

1) सौ.सुमन धनराज चामलाटे रा.आंबाडी

2) सौ.शोभा गोपाल वरकडे रा. खापा (रावनवाडी)

3) गोपाल मिताराम वरकडे रा.खापा (रावनवाडी)

4)धनराज विठोबा मेश्राम रा. खमारी

5)राजकूमार दामोधर पेशने रा. तिड्डी