Published On : Tue, Jun 15th, 2021

महामेट्रो स्टेशनला “झिरो माईल” फ्रीडम पार्क स्टेशन नाव देण्यास हेरिटेज समितीची मंजुरी

ऐतिहासिक तोफा ठेवण्याची सुध्दा मंजुरी

नागपूर : देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रधानमंत्री कार्यालयातर्फे अमृत महोत्सव सोहळयात झिरो माईल येथील मेट्रो स्टेशनचे नाव “झिरो माईल फ्रीडम पार्क स्टेशन” असे नामकरण करण्यात येणार आहे. या अनुषंगाने समितीने कस्तुरचंद पार्क मैदान येथे विकास कामे करतांना सापडलेल्या ऐतिहासिक तोफा झिरो माईल फ्रीडम पार्क स्टेशन येथे ठेवण्यात येणार आहे. महामेट्रो नागपूरच्या या प्रस्तावाला नागपूर हेरिटेज संवर्धन समितीच्या मंगळवारी (१५ जून) झालेल्या बैठकीत मंजुरी प्रदान करण्यात आली.

हेरिटेज संवर्धन समितीची बैठक मंगळवारी श्री. छत्रपती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली. बैठकीत स्ट्रक्चरल अभियंता पी.एस.पाटणकर, नागपूर विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्राध्यापक डॉ. शुभा जोहरी, वास्तु विशारद अशोक मोखा, उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम आणि सहाय्यक संचालक नगररचना हर्षल गेडाम उपस्थित होते.

महामेट्रोतर्फे फुटाळा तलावालगत प्रेक्षक दीर्घेच्या व बोगदयाच्या बांधकामाकरीता दिलेल्या बांधकाम नकाशात दुरुस्ती करण्यात आली असून आता भूमिगत बोगदा न बांधता रस्त्याच्या जागेत प्रेक्षक दीर्घेचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच फुटाळा येथे संगीतमय कारंजे, लाईट आणि साऊंड शो इत्यादी विकास कार्याला सुध्दा समितीतर्फे मंजुरी प्रदान करण्यात आली.

महाल येथील कोतवाली पोलिस स्टेशन व पोलिस उपायुक्त परिमंडल – ३ यांचे कार्यालय असलेली इमारत हेरिटेज ग्रेड – १ चे स्थळ आहे. या इमारतीला १०० वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग क्र-१ नागपूर यांनी या इमारतीचे व्ही.एन.आय.टी. नागपूर या शासकीय संस्थेकडून स्क्ट्रक्चरल ऑडीट करुन व्ही.एन.आय.टी. नागपूर या संस्थेने दिलेल्या अहवालानुसार उक्त इमारत ३ ते ४ वर्षापेक्षा जास्त कालावधीकरीता वापरण्यास सुरक्षित नाही. त्यामुळे कोतवाली पोलीस स्टेशन व पोलीस उपायुक्त परिमंडळ -३ यांचे कार्यालयाकरीता स्वतंत्र जागेची व बांधकामाकरीता निधीची व्यवस्था करावी असे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र-१ नागपूर यांनी पोलीस उपायुक्त (मुख्यालय) पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर यांना कळविले आहे.