नागपूर : लाड समितीच्या शिफारसी अतंर्गत सफाई कामगारांच्या १०६ वारसदारांना सफाई कर्मचारी म्हणून नियुक्तीचे आदेश वितरण महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीचे सभापती मनोज चापले, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संजय बंगाले, शिक्षण समितीचे सभापती दिलीप दिवे, आरोग्य समितीचे सदस्य लखन येरावार, विजय चुटेले, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, मनपा कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष राजेश हाथीबेड प्रामुख्याने उपस्थित होते.
शहर स्वच्छतेसाठी दिवसरात्र झटणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे अभिनंदन यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला यशस्वी करण्यात सफाई कामगारांचा मोठा वाटा आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडल्यास स्वच्छ नागपूर साकारणे सहज शक्य असल्याचे सांगत महापौरांनी नवनियुक्त सफाई कामगारांचे स्वागत केले. कामाच्या वेळा पाळा, कामे चोखपणे बजावा आणि आरोग्याची काळजी घ्या असा सल्लाही महापौरांनी यावेळी बोलताना दिला.