नागपूर: विदर्भात गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी आलेले फिनलॅण्डचे कौन्सिलर मिक्को पोस्टेनन यांनी नागपूर महानगरपालिकेला भेट दिली. महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर आणि आयुक्त अश्विन मुदगल यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली.
प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांनी मिक्को पोस्टेनन यांचे स्वागत केले. त्यानंतर राज्यात हायब्रीड व्हेईकल चार्जींग टेक्नॉलॉजी आदानप्रदान करण्याबाबत चर्चा झाली. आयुक्त अश्विन मुदगल यांनी त्यांना बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी संदर्भात सविस्तर माहिती दिली. भविष्यात एक हजार मेट्रिक टन कचरा विघटन करून ऊर्जा तयार करण्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूर शहर स्मार्ट करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका करीत असलेल्या कार्याबद्दल मिक्को पोस्टेनन यांनी समाधान व्यक्त केले. फिनलॅण्डच्या मुंबई येथील कन्सल्टंट प्रीती गोटेकर यांनी नागपूर शहराच्या वैशिष्ट्याबद्दलची माहिती मिक्को आणि त्यांचे सहकारी अवधेश झा यांना दिली. भविष्यात नागपूरसह विदर्भात वाहतूक आणि ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याच्या आश्वासन मिक्को यांनी महापौर नंदा जिचकार यांना दिले.
