Published On : Tue, Jul 3rd, 2018

कृषीदिनी वसंतराव नाईकांच्या पुतळ्याची अवहेलना

कन्हान : – अाशिया खंडात नावारूपाला असलेल्या नागपूर येथील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीतील माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पुतळा कृषीदिनी उपेक्षित राहिला. शेतकर्‍यां साठी प्राण वेचणा-या या महामानवाच्या जयंतीनिमित्त साधा हार सुध्दा अर्पण करण्याचे सौजन्य बाजार समितीने दाखविले नसून एकप्रकारे अपमान केला आहे. या समितीवर कार्यवाही करण्याची मागणी भटके विमुक्त कर्मचारी संघटना, वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना,संघर्ष वाहीनी यांनी केली आहे.

कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनात हरीत क्रांतीचे प्रणेते,अाधूनिक महाराष्र्टाचे शिल्पकार, माजी मुख्यमंञी वसंतराव नाईक यांच्या अर्धाकृती पूतळ्याचे अनावरण तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. ज्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी अंतिम श्वासापर्यंत प्राण वेचले त्यांच्या कार्याची सर्वसामान्य शेतकर्‍यांना माहिती व्हावी हा उद्दात हेतू होता. १ जुलै नाईक साहेबांचा जन्मदिन, संपूर्ण महाराष्र्टात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. देशातला शेतकरी उद्योगपती झालाच पाहीजे याकरीता विविध योजना शेतकर्‍यांसाठी तयार करून कृतीत उतरविणारे मुख्यमंत्री त्यांचा कालावधी पाहिला जातो. मात्र वसंतराव नाईकांना एक जुलै रोजी राज्यातील संपूर्ण जनता विनम्र अभिवादन करीत असतांना बाजार समितीतील पुतळा मात्र त्या पासून वंचित राहिला. बाजार समितीच्या आवारातील या पुतळ्याची ना स्वच्छता झाली ना रुपयाचा हार चढविण्यात आला.

या संपूर्ण प्रकरणाचे चित्रिकरण भटक्या विमुक्त कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी करून तेथील कार्यरत कर्मचार्‍यांना विचारणा केली असता आम्हाला या विषयी काही माहित नसल्याचे सांगितले. सदर प्रकरण गंभीर असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहजिल्ह्यात मा. मुख्यमंञी वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याची विटंबना लज्जा स्पद बाब आहे.

या प्रकरणी बाजार समितीच्या प्रमुखांवर कारवाई करण्याची मागणी अध्यक्ष प्रेमचंद राठोड, सचिव खिमेश बढिये, अशोक खंडाईत, वसंतराव नाईक कर्मचारी संघटनेचे विभागिय संघटन सचिव राजु चव्हाण, बेलदार समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष राजेंद्र बढिये, संघर्ष वाहिनीचे मुख्य संघटक दिनानाथ वाघमारे, मुकुंद अडेवार,वसंतराव नाईक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सूजित चव्हाण,मनोज राठोड,विनोद आकुलवार,गजानन राठोड, प्रशांत नाईक व भटक्या विमुक्त समाज बांधवांनी जिल्हाधिकारी, महसूल राज्यमंत्री राठोड, विपणन सचिव यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.