
मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आल्यानंतर ठाकरे कुटुंबीयांकडून आक्रमक भूमिका मांडण्यात आली आहे. सीबीआयने या प्रकरणात एफआयआर दाखल केल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना नावं जोडून चारित्र्यहनन केल्याचा आरोप केला.
“ज्या घटनेशी आमचा कोणताही संबंध नाही, अशा प्रकरणात आमची नावं जाणीवपूर्वक जोडली जात आहेत. आज माझं नाव घेतलं जातंय, उद्या तुमचंही नाव एखाद्या प्रकरणात जोडलं जाऊ शकतं,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी हा प्रकार गांभीर्याने घेण्याचा इशारा दिला.
चौकशी करायची असेल तर संबंधितांची चौकशी करा, मात्र विनाकारण बदनामी आणि चारित्र्यहनन थांबवा, अशी भूमिका त्यांनी मांडली. “आम्ही आतापर्यंत शांत होतो; पण आता बास झालं. अन्यथा आम्हालाही कायदेशीर पावलं उचलावी लागतील,” असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनीही सोशल मीडिया पोस्टद्वारे या आरोपांना उत्तर दिलं. दिशा सालियन यांच्याशी आपली कधीही भेट किंवा ओळख झाली नसल्याचा दावा त्यांनी केला. गेल्या सहा वर्षांपासून राजकीय हेतूने आपलं नाव या प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांनी म्हटलं.
चौकशी यंत्रणांनी कोणत्याही राजकीय दबावाशिवाय आणि निःपक्षपातीपणे तपास करावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच माध्यमांमधील आरोप-प्रत्यारोप किंवा चर्चांमुळे सत्य बदलणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं.




