Published On : Sat, Feb 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

देवाच्या दारात भेदभाव? नागपूरच्या साई मंदिरात दिव्यांग असल्याने अबोली जारित यांना रोखले

Advertisement
नागपूर-फक्त दिव्यांग असल्यामुळे एखाद्या व्यक्तीला देवाच्या दर्शनापासून रोखता येतं का?
नागपूरमधील एका धक्कादायक घटनेमुळे हा प्रश्न आता थेट समाजासमोर उभा ठाकला आहे.
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिव्यांग महिला अबोली जारित या वर्धा रोडवरील साई मंदिर, नागपूर येथे दर्शनासाठी गेली असता, मंदिर प्रशासनाने तिला प्रवेश नाकारला.
व्हीलचेअरवर असलेल्या अबोली जारित हिला “खूप गर्दी आहे, नंतर या” असं कारण देत मंदिराच्या दारातच थांबवण्यात आलं.
मात्र हा केवळ गर्दीचा मुद्दा नव्हता, तर संवेदनशीलतेचा अभाव आणि दिव्यांगांच्या हक्कांबाबतची उदासीनता पुन्हा एकदा उघड करणारी घटना ठरली.
व्हीलचेअरवर बसलेल्या एका राष्ट्रीय सन्मानित महिलेला मंदिराच्या पायऱ्यांवरच थांबवलं गेलं आणि आजूबाजूची व्यवस्था केवळ बघ्याची भूमिका घेत राहिली.
ही घटना केवळ मंदिर प्रवेशापुरती मर्यादित नसून, ती सन्मान, समानता आणि माणुसकी यांच्याशी थेट संबंधित आहे.
‘नागपूर टुडे’ने याबाबत अबोली जारित यांच्याशी संवाद साधला. या घटनेवर बोलताना अबोली जारित म्हणाल्या,मी मंदिरात कोणतीही विशेष सवलत मागायला गेले नव्हते.
मला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार घेऊन साई बाबांचे आशीर्वाद घ्यायला गेले होते.
मी दिव्यांग आहे, पण अपवित्र नाही.
मी व्हीलचेअरवर आहे, पण माझी श्रद्धा चालत येऊ शकत नाही का?
मला मंदिराच्या दारात थांबवलं गेलं, तेव्हा शारीरिक वेदना नव्हत्या — मानसिक वेदना होत्या.
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त व्यक्ती म्हणून नव्हे, तर एक सामान्य भक्त म्हणून मी अपमानित झाले.
मंदिरं माणसांना जोडण्यासाठी असतात, तोडण्यासाठी नाहीत.
जर देवाच्या दारातच दिव्यांगांसाठी जागा नसेल, तर समाजाने आत्मपरीक्षण करायला हवं.
ही लढाई माझी एकटीची नाही. उद्या माझ्या जागी कुणीही असू शकतं.”
समाजासमोर मोठा प्रश्न-
“सर्व समान आहेत” अशी भाषा करणाऱ्या समाजात, प्रत्यक्षात दिव्यांग व्यक्तींना आजही मूलभूत सन्मानासाठी संघर्ष करावा लागतो, हे या घटनेतून स्पष्ट होत आहे.आता प्रश्न मंदिर व्यवस्थेलाच नाही, तर संपूर्ण समाजालाच आहे.
जर पूजा स्थळांमध्येच माणुसकी आणि संवेदनशीलता नसेल, तर ती नक्की कुठे सापडणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement