Published On : Thu, Dec 12th, 2019

स्मशानभूमीत नियमित स्वच्छता करा !

Advertisement

स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांचे निर्देश : अंबाझरी, मोक्षधामचा केला दौरा

नागपूर : नागपूर शहरातील स्मशानभूमींवर पर्यावरपूरक दहन व्हावे यासाठी आग्रही असलेल्या स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी बुधवारी (ता. ११) अंबाझरी आणि मोक्षधाम दहनघाटाचा दौरा केला. पर्यावरणपूरक दहनाची व्यवस्था करा आणि स्मशानभूमींवर नेहमी स्वच्छता ठेवा, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांच्या दौऱ्यात सत्तापक्ष उपनेते बाल्या बोरकर, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती अभय गोटेकर, माजी उपमहापौर दीपराज पार्डीकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार उपस्थित होते.

अंबाझरी घाटावर ब्रिकेटस्‌चा वापर करून मृतदेहाचे दहन करण्यात येते. याबाबत डॉ. प्रदीप दासरवार यांनी माहिती दिली. तर मोक्षधाम येथे प्रस्तावित असलेल्या पर्यावरणपूरक दहनाबाबतच्या प्रस्तावाबाबतही डॉ. दासरवार यांनी पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. या दोन्ही घाटावर पर्यावरणपूरक दहनाची जी व्यवस्था आहे, त्याला नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे, याबाबतही स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी जाणून घेतले.

नागपूर शहरातील घाटांवर पर्यावरणपूरक दहन व्हावे, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करा. अंबाझरी, मोक्षधामसह सर्वच घाटांवर स्वच्छतेला प्राधान्य द्या. मृत्यू प्रमाणपत्रासाठी नागरिकांना त्रास होऊ नये, याची दक्षता घ्या, असे निर्देश यावेळी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी दिले.