Published On : Tue, Apr 2nd, 2019

दिव्यांगांना मतदान केंद्रावर मतदानासाठी सुलभ व्यवस्था – अश्विन मुदगल

नागपूर: लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिव्यांग, अपंग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील 8 हजार 411 दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी हेल्प लाईनसह विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी आज दिली.

भारत निवडणूक आयोग तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार सर्वप्रकारच्या अपंग व दिव्यांग व्यक्तींना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सूचना दिल्यानुसार जिल्ह्याची सर्व मतदार केंद्रांवर दिव्यांगांना सहज आणि सुलभपणे मतदान करता यावे यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. एखादा व्यक्ती जर अंध किंवा एखाद्या तीव्र शारीरिक व्याधींनी ग्रस्त असेल आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील चिन्ह ओळखण्यास सक्षम नसेल, अशा परिस्थितीत मतदान अधिकाऱ्याच्या परवानगीने सहाय्यक मदत करु शकतो.

Advertisement

जिल्ह्यात 8 हजार 411 दिव्यांग व्यक्तींची नोंद मतदार यादीमध्ये करण्यात आली आहे. यासाठी निवडणूक आयोगाद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या संकेतस्थळाद्वारे आणि ऑनलाईन ॲपद्वारे नोंदणी झाली असून दिव्यांग मतदाराला व्हिलचेयरची आवश्यकता आहे. त्यानुसार व्हिलचेअर पुरविण्यात येणार आहेत. यासाठी 438 व्हिलचेयरची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.

जिल्ह्यात विधानसभा मतदार संघनिहाय दिव्यांगांची नोंद झाली असून यामध्ये 1 हजार 70 अंध, 953 कर्णबधीर, 4 हजार 855 अस्थिव्यंग तर 1 हजार 533 इतर अपंगत्व मतदारांची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक मतदार उमरेड 1 हजार 333 असून रामटेक मतदार संघात 1 हजार 118, काटोल 858, सावनेर 757, हिंगणा 817, दक्षिण- पश्चिम नागपूर 530, दक्षिण- नागपूर 497, पूर्व- नागपूर 456, मध्य- नागपूर 338, पश्चिम व उत्तर नागपूर प्रत्येकी 451, कामठी 832 दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.

दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यामध्ये अपंग तसेच दिव्यांग व्यक्तींना रांगेत प्रतीक्षेत न राहता मतदान करण्यास प्राधान्य, मतदान केंदावर कायमस्वरुपी किंवा संपूर्ण सुविधा, अंध प्रकारातील मतदारांकरिता ब्रेल लिपितील मतदार स्लिप, डमी मतदान पत्र (बॅलेट पेपर), अल्पदृष्टी दिव्यांग व्यक्तींकरिता मैग्नीफाइंग ग्लास, मैग्नीफाइंग शिट इत्यादी साहित्य, अंध मतदारांना मतदान अधिकाऱ्याच्या परवानगीने मतदारांसह सहकार्यांना सोबत नेण्याची परवानगी, मागणीनुसार 438 व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे, परिसरात सोयी आणि सुविधा दर्शक संकेत चिन्ह, अपंग व्यक्तींना मार्गदर्शन व सहाय्य करण्यासाठी विशेष शिक्षक, अपंग शाळेतील कर्मचारी, स्वयंसेवकांची व्यवस्था, शासकीय वाहनाने दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी सुविधा, जिल्ह्यात एक पर्यवेक्षक, निरीक्षकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.

दिव्यांग मतदारांमध्ये अधिक जनजागृती व्हावी, याकरिता यशवंत स्टेडियम, धंतोली येथे अपंग मतदाता सहायता केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्यामध्ये अपंग प्रवर्गानुसार कॉल सेंटरची व्यवस्था, ई. व्ही. एम. हाताळणी प्रशिक्षण सेवा, अपंग क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाचे प्रशिक्षण, विशेष शाळा कर्मचारी प्रशिक्षण, निवडणूक प्रक्रिया संबंधित सर्व समस्यांचे निवारण, जनजागृती कार्यक्रम नोडल अधिकारी अभिजित राऊत हे राबवत आहेत.

दिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रियेत सहज भाग घेता यावा यासाठी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल, उप- जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती राजलक्ष्मी शहा, रामटेक उप-जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत फडके, उपल्हिाधिकारी अविनाश कातडे तसेच प्रशिक्षण नोडल अधिकारी रविंद्र कुंभारे यांनी विशेष नियोजन केले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement