मुंबई : यंदाच्या सततच्या अतिवृष्टीमुळे राज्यात तब्बल ६० लाख हेक्टर क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज शासनाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत जाहीर केले की, “दिवाळीपूर्वी मदतीचा प्रत्येक रुपया थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. पुढील आठवड्यात याबाबत सविस्तर घोषणा केली जाईल.”
ऑगस्टपर्यंतच्या नुकसानीसाठी राज्य सरकारने २,२१५ कोटी रुपयांचे वितरण सुरू केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना अडचण न येता थेट लाभ मिळावा म्हणून यासाठी ई-केवायसीची सक्ती रद्द करण्यात आली आहे. अजून काही भागांत पाणी साचले असल्याने संपूर्ण माहिती गोळा करण्यात वेळ लागत आहे, मात्र पुढील दोन-तीन दिवसांत सर्व आकडेवारी उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “जमीन वाहून गेलेली असेल, विहिरींचे नुकसान झाले असेल किंवा घरं उद्ध्वस्त झाली असतील, अशा सर्व नुकसानीसाठी समग्र धोरण आखून मदत केली जाईल. दिवाळीपूर्वीच ती थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.”
‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी होत असली, तरी धोरणात असा उल्लेख नसल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र दुष्काळी उपाययोजनांप्रमाणे सर्व सवलती आणि योजना याही वेळी लागू करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारकडूनही मदत अपेक्षित असल्याचे फडणवीस म्हणाले. “दिल्लीकडून मदत होणार आहेच, पण तिची वाट पाहत न बसता राज्य सरकार तत्काळ निधी देत आहे. संपूर्ण नुकसानीचा आढावा घेऊन एकत्रित प्रस्ताव केंद्राला पाठवला जाईल,” असे त्यांनी नमूद केले.