Published On : Fri, Nov 2nd, 2018

महावितरणच्या संचालक (संचालन) पदी दिनेशचंद्र साबू

नागपूर : महावितरणच्या संचालक (संचालन) या पदावर दिनेशचंद्र साबू यांची नियुक्ती झाली असून त्यांनी गुरूवारी दि. १ नोव्हेंबरला पदभार स्वीकारला आहे. साबू यापूर्वी महावितरणचे संचालक (प्रकल्प) या पदावर प्रकाशगड मुख्यालय, मुंबई येथे कार्यरत होते.

दिनेशचंद्र साबू हे अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव कसबा येथील रहिवासी आहेत. ते 1983 मध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून रूजू झाले. त्यानंतर त्यांनी विविध पदांवर काम केले. 2008 मध्ये त्यांची अधीक्षक अभियंता म्हणून कळवा येथील भारप्रेषण केंद्रात नियुक्ती झाली. वसई व वाशी येथेही अधीक्षक अभियंता म्हणून त्यांनी काम केले आहे.

त्यांनी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २०१३ मध्ये दिनेशचंद्र साबू यांची मुंबई मुख्यालयात पायाभूत आराखडा विभागाचे मुख्य अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी ही महत्वाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.

दिनेशचंद्र साबू यांची कार्यकारी संचालक पदावर सरळ सेवा भरतीने बढती झाल्यानंतर केवळ आठ महिन्यात त्यांच्या उत्कृष्ट कार्यकाळाची दखल घेऊन व्यवस्थापनाने त्यांची दोन वर्षापूर्वी संचालक (प्रकल्प) या पदावर नियुक्ती केली. साबू यांनी आपल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रम व दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत.

तसेच प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना ‘सौभाग्य’ या योजनेच्या अंमलबजावणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली साबू यांनी एलिफंटा येथील विद्युतीकरणाचे काम यशस्वीपणे पूर्ण केले. या कामाचा मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी विशेष गौरव केला आहे.