नागपूर: महावितरण कंपनीच्या नागपूर परिमंडल मुख्य अभियंता पदी दिलीप घुगल यांनी आज सूत्रे स्वीकारली. या आधी ते चंद्रपूर परिमंडळात मुख्य अभियंता पदी कार्यरत होते.
मूळचे नागपूरकर असलेले घुगल यांनी कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांतून विदुयत शाखेची १९९० मध्ये पदी घेतली. १९९४ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्य विदुयत मंडळात चंद्रपूर येथे घुगल कनिष्ठ अभियंता पदी रुजू झाले. या नंतर नागपूर येथील काटोल रोड शाखा कार्यालयात त्यांनी सुमारे ६ वर्ष काम केले.
वीज मंडळाच्या विभाजनानंतर सुमारे एक वर्ष त्यांनी महापारेषण कंपनीत अती उच्चदाब विभाग आणि चाचणी विभागात काम केल्यावर परत महावितरण कंपनीत नागपूर ग्रामीण-१ विभागात कार्यकारी अभियंता म्हणून ते रुजू झाले. २०११ मध्ये थेट भरती प्रकियेतून अधीक्षक अभियंता म्हणून निवड झाल्यावर धुळे येथे दोन वर्ष काम केल्यावर अमरावती मंडल कार्यालयात त्यांनी काम केले. जानेवारी २०१६ मध्ये मुख्य अभियंता पदी निवड झाल्यावर नव्याने स्थापित झालेल्या चंद्रपूर परिमंडळात त्यांची नियुक्ती करण्यात आली.
अमरावती येथे अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत असताना महावितरणच्या “स्काडा” प्रकल्पाची प्रभावीपणे अंमलबाजवणी त्यांनी केली होती. चंद्रपूर परिमंडलात कार्यरत असताना गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या प्रत्येक गावात जातीने लक्ष घालून वीज पुरवठा सुरु करण्याचे श्रेय घुगल यांना जाते. महावितरणच्या नागपूर परिमंडलात नागपूर आणि वर्धा जिल्ह्याचा समावेश होतो.
