Published On : Wed, Jun 2nd, 2021

२० दिवस झोपले होते का? : माजी महापौर संदीप जोशी

पोलिस स्टेशन समोर धरणे आंदोलनानंतर पोलिसांची सारवासारव

नागपूर : क्रिस्टल केअर रुग्णालयाच्या निष्काळजीपणा आणि अमानुष वागणुकीचा बळी ठरलेल्या दिलीप कडेकर या मृतकाच्या नातेवाकाईकांना न्याय मिळावा, यासाठी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी वारंवार करूनही न्याय न मिळाल्याने अखेर माजी महापौर संदीप जोशी यांनी पोलिसांना दिलेल्या इशा-यानुसार बुधवारी (ता.२) पाचपावली पोलिस स्टेशनपुढे मृतकाच्या नातेवाईकांसोबत धरणे आंदोलन केले. या आंदोलनाचा धसका घेत पोलिस प्रशासनाने सारवासारव सुरू केली. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून याबाबत मेडिकल आणि महानगरपालिका प्रशासनाला अभिप्रायाकरिता १ जून रोजी पत्र दिल्याची माहिती पाचपावली पोलिस प्रशासनामार्फत देण्यात आली. मागील २० दिवसांपासून कारवाई करीत असल्याचे सांगणारे पोलिस प्रशासन १ जूनला अभिप्राय मागवित असेल तर २० दिवस झोपले होते का, असा घणाघाती सवाल माजी महापौर संदीप जोशी यांनी विचारला आहे.

राणी दुर्गावती चौकातील क्रिस्टल केअर हॉस्पिटलवर कारवाई करून मृताच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी माजी महापौर संदीप जोशी यांनी बुधवारी (ता.) मृतक दिलीप कडेकर यांची पत्नी, मुलगा, बहीण आणि भाउ यांच्यासोबत पाचपावली पोलिस स्टेशनसमोर धरणे आंदोलन केले.

यासंबंधी माहिती देताना माजी महापौर संदीप जोशी यांनी सांगितले की, १२ मे रोजी प्रणीत कडेकर या तरुणाची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीमध्ये त्याचे वडील क्रिस्टल नर्सिंग होम, राणी दुर्गावती नगर येथे भरती असून हॉस्पिटलकडून वारंवार पैशाची मागणी केली जात असून पैसे न दिल्यास त्यांची औषधे बंद करू, अशा धमक्या दिल्या जात असल्याचे सांगतिले होते. प्रणीतची तक्रार प्राप्त होताच १२ मे रोजी स्वत: हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. मागील आठ दिवसांपासून व्हेंटिलेटरवर असलेल्या दिलीप कडेकर या रुग्णाचे त्याच दिवशी दुपारी दोन वाजता व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आले. त्याच रात्री दिलीप कडेकर यांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या प्रकरणात हॉस्पिटलवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, याकरिता प्रणीत कडेकर आणि त्याच्या परिवारासोबत स्वत: पाचपावली पोलिस गाठले. पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. यावेळी पोलिस प्रशासनाद्वारे ‘आम्ही सखोल चौकशी करू, नियमाप्रमाणे आम्हाला तांत्रिक माहिती नसते त्यामुळे शासकीय मेडिकल बोर्डच्या न्यायिक मंडळाकडून महानगरपालिकेकडून काही उत्तरे हवी आहेत, असे सांगण्यात आले.

१३ मे नंतर १७ मे व २१ ला पुन्हा पोलिस स्टेशनला पत्र देण्यात आले. २३ मे रोजी स्वत: वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मेंढे यांच्याशी चर्चा केली. एवढे होउनही पोलिस प्रशासनाचे ‘आमची चौकशी सुरू आहे’, हे उत्तर कायम होते. त्यानंतर ३१ मे रोजी धरणे आंदोलन करणार असल्याचे पत्र पोलिस प्रशासनाला दिले. यावर ‘आपण धरणे करू नका, अन्यथा आपल्यावर कारवाई होईल’, असे उत्तर देण्यात आले.

बुधवारी (ता.२) धरणे देत असतानाच २१ मिनिटाच्या आतच पोलिसांनी आतमध्ये बोलावले. ‘आम्ही या प्रकरणाची आणखी चौकशी करीत आहोत आणि यामध्ये आणखी तीन आठवडे लागणार आहेत. यासंदर्भात मेडिकल प्रशासन आणि महानगरपालिकेला अभिप्राय मागितला असून त्यांचा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर कारवाई ’करू असे यावेळी पोलिस प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दुर्दैवाची बाब म्हणजे, ३१ मे रोजी पत्र दिल्यानंतर पोलिस प्रशासनाद्वारे मेडिकल आणि महानगरपालिका प्रशासनाकडून १ जून रोजी अभिप्राय मागण्यात आला. पोलिस प्रशासनाद्वारे १ जून ला मेडिकल आणि मनपाला पत्र देण्यात आले. एकूणच संपूर्ण प्रकरणामध्ये काही ना काही काळंबेरं, साटेलोटे निश्चितच असल्याचे आता स्पष्ट होत आहे, असा आरोपही संदीप जोशी यांनी केला.

धरणे आंदोलन करण्याचे पत्र दिल्यानंतर त्याबाबत स्थानिक प्रशासनाकडून अभिप्राय मागविण्यासाठी १ जूनला पत्र पाठविले जाते. यावरून मागील २० दिवसापासून हे पोलिस प्रशासन झोपलेले होते की काय, हा प्रश्न मनात येतो. त्यामुळे आज पोलिस प्रशासनाने दिलेल्या माहितीनंतर पुन्हा पोलिस प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे की, एका हसत्या खेळत्या कुटुंबातील व्यक्ती गेली, पैसाही गेला आज त्यांचा संपूर्ण परिवार उघड्यावर पडलेला आहे. याबाबत किमान मानवीस दृष्टीकोन ठेवून क्रिस्टल नर्सिंग होम विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही संदीप जोशी यांनी केली.

आज शहरातील ८० टक्के हॉस्पिटल्स चांगले काम करीत असताना अशा २० लुबाडणूक करणा-या हॉस्पिटलमुळे समाजामध्ये हॉस्पिटलची आणि डॉक्टरांची प्रतीमा मलीन झालेली आहे. त्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तात्काळ दाखल करावा, अन्यथा येणा-या दिवसांमध्ये उग्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही पोलिस प्रशासनाची राहिल, असा इशाराही माजी महापौर संदीप जोशी यांनी दिला.