Published On : Sun, May 28th, 2017

भाजपने दिलीप कांबळेंना हीच शिकवण दिली का? : खा. अशोक चव्हाण

Ashok Chavan
मुंबई:
“पत्रकारांना जोड्याने मारेन, आपल्याला पक्षाने हीच शिकवण दिली आहे.” असे म्हणणा-या राज्यमंत्री दिलीप कांबळेंना भाजपने ही शिकवण दिली आहे का? याचा खुलासा करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या “पत्रकारांना जोड्याने मारेल” या वक्तव्याचा निषेध करून खा. चव्हाण म्हणाले की, स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणवून घेणा-या भाजपचा खरा चेहरा पुन्हा एकदा दिलीप कांबळे यांच्या वक्तव्यावरून समोर आला आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणा-या माध्यमांना प्रश्न विचारणे आणि सरकारच्या चुकीच्या धोरणावर आणि निर्णयावर टीका करण्याचा अधिकार लोकशाहीने दिलेला आहे. परंतु केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून सरकारविरोधात बोलणा-यांचा आवाज बंद करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सरकारच्या धोरणावर टीका करणा-या सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून, देशद्रोही ठरवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. आता तर भाजपचे मंत्री जाहीरपणे पत्रकारांना जोड्याने मारण्याच्या धमक्या देत आहेत आणि आपल्याला आपल्या पक्षाने हीच शिकवण दिल्याचे सांगत आहेत. भाजप आपल्या नेत्यांना आणि मंत्र्यांना हीच शिकवण देते का ? याचा खुलासा करावा असे खा. चव्हाण म्हणाले.

केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून येनकेन प्रकारे निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारांचा आणि माध्यमांचा आवाज दाबण्याचे प्रयत्न केंद्र आणि भाजपशासीत राज्यातील सरकारांकडून सुरु आहेत. यापूर्वीही केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते जनरल व्ही. के. सिंग यांनी पत्रकारांबाबत अशीच भाषा वापरली होती. भाजपचे नेते आणि मंत्री सरकारविरोधात लिहिणा-या बोलणा-या पत्रकारांना धमक्या देत आहेत, मात्र त्यांच्यावर सरकार आणि पक्ष कुठलीही कारवाई करित नाही. त्यामुळे हे सर्व सरकारच्या मुकसंमतीने सुरु आहे असे दिसते. पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेने एकमताने पत्रकार हल्ला विरोधी कायदा मंजूर केला आहे. याच विधानसभेचे सदस्य आणि राज्य मंत्रीमंडळातील मंत्री दिलीप कांबळे हे पत्रकारांना जोड्याने मारण्याची भाषा करित आहेत हे दुर्देवी असून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मंत्रीमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.