
नागपूर : बसच्या धडकेने एका होतकरू अभियंत्याचा जीव घेतल्याने नागपुरात खळबळ उडाली आहे. VNIT मधील अभियांत्रिकीचा माजी टॉपर असलेल्या ३४ वर्षीय सर्वेश करोलिकर यांच्या मृत्यूमुळे संजय ट्रॅव्हल्सच्या बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही संजय ट्रॅव्हल्सच्या बसशी संबंधित दोन गंभीर अपघात घडले आहेत. त्यामुळे बसची देखभाल, चालकांची दक्षता आणि प्रवासी व रस्त्यावरील नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
२६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास बजाजनगर परिसरातील RPTS रोडवर असली कॉफी कॅफेजवळ हा अपघात घडला. सर्वेश करोलिकर सायकलने जात असताना मध्य प्रदेश नोंदणी क्रमांक MP-20-ZV-0651 असलेल्या संजय ट्रॅव्हल्सच्या बसने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत तो गंभीर जखमी झाला. त्याला सुरुवातीला स्वास्थ्यंम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी विवेकानंद रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, आज उपचार सुरू असताना सोमवारी त्याची प्राणज्योत मालवली. अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून पसार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात बजाजनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेचे कलम १०६ जोडले आहे.
संजय ट्रॅव्हल्सच्या बसशी संबंधित अपघातांची ही पहिलीच घटना नाही. ९ सप्टेंबर रोजी नागपुरातील वैष्णोदेवी चौकात याच कंपनीच्या बसने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात एक महिला आणि तिची चार वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली होती. त्यापूर्वी ४ जून रोजी समृद्धी महामार्गावर नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या संजय ट्रॅव्हल्सच्या बसची टिप्परला धडक झाली होती. या दुर्घटनेत १९ प्रवासी जखमी झाले होते. त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले होते.
एकामागून एक समोर येणाऱ्या या घटनांमुळे संजय ट्रॅव्हल्सच्या बसच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. बसची नियमित तांत्रिक तपासणी केली जाते का? चालकांच्या कामाच्या वेळा आणि त्यांच्या दक्षतेवर नियंत्रण ठेवले जाते का? फिटनेस प्रमाणपत्र आणि वाहतूक नियमांचे पालन कितपत काटेकोरपणे होते? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे.
सर्वेश करोलिकर यांच्या मृत्यूने एका कुटुंबाचा आधार हिरावला आहे. त्यामुळे या प्रकरणाची केवळ अपघात म्हणून नोंद करून थांबण्याऐवजी संजय ट्रॅव्हल्सच्या संबंधित बसची तांत्रिक तपासणी, यापूर्वीच्या अपघातांची पार्श्वभूमी आणि चालकांच्या भूमिकेची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. खासगी बस कंपन्यांच्या निष्काळजीपणाची जबाबदारी निश्चित होणार का आणि भविष्यात अशा दुर्घटना रोखण्यासाठी प्रशासन ठोस पावले उचलणार का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.



