Published On : Mon, Nov 2nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

एफ-२ वाघिणीचा बछडा पेंचच्या जंगलात दाखल

Advertisement

Auto Draft

रामटेक : एका जंगलातून दुसऱ्या जंगलात… स्वतंत्र अधिवासाच्या शोधात निघालेला उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील एफ-२ वाघिणीचा तरुण नर बछडा आता पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या जंगलात दाखल झाला आहे. अंदाजे तीन ते चार वर्षांचा हा वाघ पेंचच्या चोरबाहुली क्षेत्रात पोहोचला असून, शुक्रवारी दुपारच्या सफारीदरम्यान पर्यटकांना त्याचे जवळून आणि दीर्घकाळ दर्शन झाले. शरीरावरील वैशिष्ट्यपूर्ण काळ्या पट्ट्यांच्या रचनेवरून त्याची ओळख पटवण्यात आली आहे.

शिकारीवर ताव, पाणवठ्यावर विश्रांती
उमरेड-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यातील गोठणगाव झोनमधून प्रवास करत हा तरुण नर वाघ पेंचच्या जंगलात दाखल झाला. शुक्रवारी दुपारच्या सफारीदरम्यान पर्यटकांना त्याच्या नैसर्गिक हालचाली पाहण्याची संधी मिळाली.

जंगलालगत केलेल्या शिकारीवर ताव मारल्यानंतर या वाघाने पाण्याच्या डबक्यात काही काळ विश्रांती घेतली. त्यानंतर परिसरात फिरत त्याने विविध ठिकाणी क्षेत्रचिन्हांकन केले. वाघाच्या या हालचाली पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरल्या.

पट्ट्यांच्या रचनेवरून पटली ओळख
प्रत्येक वाघाच्या शरीरावरील काळ्या पट्ट्यांची रचना वेगळी असते. या पट्ट्यांच्या तुलनात्मक निरीक्षणातून वाघाची स्वतंत्र ओळख पटवता येते. याच पद्धतीने ‘डेक्कन ड्रिफ्ट्स’चे वन्यजीव अभ्यासक पियुष आकरे, चोरबाहुली गेटचे वनमार्गदर्शक अजय सोनटक्के आणि अविनाश चौधरी यांनी या तरुण नर वाघाची ओळख निश्चित केली.

Advertisement

हा वाघ उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील प्रसिद्ध एफ-२ वाघिणीच्या पाच बछड्यांपैकी एक असल्याचे त्याच्या शरीरावरील पट्ट्यांच्या रचनेवरून स्पष्ट झाले. सफारीदरम्यान त्याच्या विविध हालचाली आणि देखणे क्षण कॅमेऱ्यात टिपण्यात आले.
स्वतंत्र अधिवासाच्या शोधात तरुण नर वाघांचे स्थलांतर
वाघांच्या जीवनचक्रात विशिष्ट वयानंतर स्वतंत्र अधिवासाच्या शोधात मूळ क्षेत्र सोडण्याची नैसर्गिक प्रक्रिया सुरू होते. विशेषतः तरुण नर वाघ नवीन जंगलात प्रवेश करून स्वतःचे क्षेत्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातून पेंचच्या जंगलात दाखल झालेल्या या नर वाघाच्या प्रवासामुळे वाघांच्या नैसर्गिक स्थलांतराचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. त्याच्या आगमनामुळे वन्यजीव अभ्यासकांसह पर्यटकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रतिनिधी : अजय मेहरकुळे, रामटेक

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.