Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Mar 7th, 2018

  धर्मा पाटील जमीन मोबदला प्रकरण: निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करणार – ऊर्जामंत्री

  Chandrashekhar Bawankule
  मुंबई: धुळे जिल्ह्यातील मौजा विखरण येथील धर्मा मंगा पाटील जमीन मोबदला प्रकरणी निवृत्त न्यायाधीशा मार्फत चौकशी करण्यात येऊन तीन महिन्यात ही समिती अहवाल देईल अशी घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली.

  सत्ताधारी व विरोधी पक्षाचा एकत्रित 293 च्या प्रस्तावावर ऊर्जामंत्री बावनकुळे उत्तर देत होते. विविध विषयांचा समावेश असलेल्या या प्रस्तावाच्या उत्तरात माहिती देताना ऊर्जामंत्री म्हणाले, धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे 660X 5 मेगावॉट प्रकल्प उभारण्यासाठी मौजे विखरण, मेथी, कामपूर, वरझडी 623 हेक्टर भूसंपादनाचा प्रस्ताव 2009 मध्ये महानिर्मितीतर्फे सादर करण्यात आला होता.

  मौजे विखरण आणि मेथी येथील 435 हेक्टर जमीन संपादन करण्यात आली. पण काही शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे 352 हेक्टर जीमन या प्रस्तावातून वगळली. नंतर मौजे विखरण येथे 675 हेक्टर जमीनीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. वाटा-घाटी करून 10 लाख रूपये प्रति हेक्टर जमीन विकत घेण्यास तत्कालीन शासनाने मंजुरी दिली होती. 4 ते 21 जानेवारी 2012 या दरम्यान वाटा-घाटी झाल्या. 476 हेक्टर जमीन संपादन झाली. महानिर्मितीने जमिनीचा ताबा घेतला.

  दरम्यान 199 हेक्टरवरील शेतकऱ्यांनी 10 लाख रूपये हेक्टर या दराला विरोध केला. तत्कालीन ऊर्जामंत्र्यांनी शेतकऱ्यांना समजावले पण शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत ऐकले नाही. त्यामुळे रेडिरेकनरच्या दरानुसार भूसंपादनाचा निर्णय झाला. धर्मा पाटील व नरेंद्र पाटील यांना तेव्हा 2.18 लाख रू. हेक्टर नुसार मोबदला घोषित झाला. त्यांनी मोबदला स्वीकारला, पण 199 हेक्टरवरील शेतकऱ्यांनी मात्र हा मोबदला घेण्यास नकार दिला. ज्यांनी पैसे घेण्यास नकार दिला त्या शेतकऱ्यांनी वाढीव मोबदल्याची मागणी केली.

  धर्मा पाटील यांनी 13-4-2017 व नरेंद्र पाटील यांनी 13-1-2016 ला आंबा झाडांचे पैसे द्यावे ही मागणी केली. आम्हाला मिळालेली किंमत ही कमी होती अशी त्यांची तक्रार होती. ज्या शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदला घेतला नाही, त्यांनी किमान 10 लाख रूपये प्रति हेक्टर तरी मोबदला मिळावा अशी मागणी केली. मात्र एकदा भूसंपादनाचे अवार्ड घोषित झाल्यानंतर त्यात वाढ करण्याचा अधिकार कुणालाही नाही. वाढीव मोबदल्यासाठी भूसंपादन कलम 18 नुसार दिवाणी न्यायालयात दाद मगण्यासाठी एकही शेतकरी गेला नाही. विद्यमान शासनाने सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव तयार केला यासाठी ऊर्जा खात्याने पुढाकार घेतला. त्यात 10 लाख रू. हेक्टर जिरायती, 15 लाख रू. हेक्टर निमबागायती व 20 लाख रू हेक्टरी मोबदला बागायती जमिनीला देण्याचा निर्णय झाला.

  वरीलप्रमाणे सानुग्रह अनुदानाच्या प्रस्तावानुसार धर्मा पाटील यांना 24 लाख 64 हजार 562 व नरेंद्र पाटील यांना 23 लाख 95 हजार 172 रूपये देण्यात आले. 199 हेक्टर वरील सर्व शेतकऱ्यांना एकूण 30 कोटी देण्याचा निर्णय झाला.

  धर्मा पाटील व नरेंद्र पाटील यांना 2012 ते 2017 या कालावधीचे व्याज आणि जमिनीचे 15 लाख रूपये हेक्टर प्रमाणे सानुग्रह अनुदानाचे अनुक्रमे एकूण रू. 48,59,754 दोघांच्याही खात्यात जमा करण्यात आले आहे.

  यानंतरही नरेंद्र पाटील यांनी काही मागण्या केल्या आहेत. आता या जमीन मोबदला प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्यात येईल अशी घोषणा करून 3 महिन्यात अहवाल देण्यात येईल अशी माहिती ऊर्जामंत्र्यांनी विधानसभेत दिली. या उत्तरादरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील व अन्य सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला.


  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145