नागपूर : धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या कारची काच फोडून बॅग चोरीची घटना घडली आहे. वर्धा रोडवरील गोरक्षण आश्रमासमोर उभी असलेल्या कारला चोरट्यांनी लक्ष्य करत लॅपटॉप, रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग लंपास केली. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे.
तक्रारदार मुकेश गोपीचंद बांते (वय ३७) हे खासगी इंटरनेट कंपनीत एरिया मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. ते आपल्या मित्र अजय अमरसिंह यांच्यासह कामानिमित्त हितवाद बसस्टॉपजवळील स्पंदन रुग्णालयात गेले होते. त्यांनी कार गोरक्षण आश्रमासमोर रस्त्याच्या कडेला उभी करून रुग्णालयात प्रवेश केला.
याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने कारची काच फोडली आणि मागील सीटवर ठेवलेली बॅग चोरून नेली. या बॅगेत लॅपटॉप, रोख रक्कम, आधार कार्ड, पॅन कार्ड, आयसीआयसीआय बँकेचे डेबिट कार्ड, मोबाईल चार्जर तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे असा सुमारे ३५ हजार रुपयांचा ऐवज होता.
काम आटोपून परत आल्यानंतर कारची काच फुटलेली आणि बॅग गायब असल्याचे दोघांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ धंतोली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.





