Published On : Tue, Dec 16th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात आचारसंहितेपूर्वी गडकरी–फडणवीसांचा विकासकामांचा धडाका; राजकीय चर्चांना उधाण

Advertisement

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून १५ डिसेंबरच्या सुमारास महापालिका निवडणुकीची घोषणा होणार आणि त्यानंतर आचारसंहिता लागू होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत होता. अखेर हिवाळी अधिवेशन संपताच राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आणि हा अंदाज खरा ठरला.

विशेष म्हणजे, याच घोषणेच्या काही तास आधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहरातील कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आचारसंहिता लागू होणार असल्याची पूर्वकल्पना होती का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

Gold Rate
16 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,32,000 /-
Gold 22 KT ₹ 1,22,800 /-
Silver/Kg ₹ 1,91,300/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच दोन्ही नेत्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रमांचा ताळमेळ साधत नागपूर शहरातील सुमारे १५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. कार्यक्रम आटोपताच मुख्यमंत्री फडणवीस मुंबईकडे रवाना झाले. नागपूरसह राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका गेली जवळपास पावणेचार वर्षे रखडलेल्या आहेत.

ओबीसी आरक्षण, प्रभागरचना आणि निवडणूक पद्धतीवरील वादामुळे या निवडणुकांचा मार्ग अडथळ्यात सापडला होता. मात्र, ३१ जानेवारी २०२६ पूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिल्यानंतर प्रशासन आणि राजकीय हालचालींना वेग आला आहे. नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने सुरू असून, दुसऱ्या टप्प्यात २० डिसेंबरला मतदान आणि २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

नागपूर महानगरपालिकेसाठी प्रभागरचना पूर्ण झाली असून, प्रारूप मतदार यादीवरील हरकती निकाली काढून सोमवारी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येत आहे. मात्र, प्रभागनिहाय आरक्षणात ५० टक्क्यांहून अधिक मर्यादा ओलांडल्याचा मुद्दा अद्याप प्रलंबित असून, त्यावर राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट दिशा मिळालेली नाही.

या पार्श्वभूमीवर, आचारसंहिता लागू होण्याची शक्यता गृहीत धरून शहरात विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन झपाट्याने उरकण्यात येत आहे. शनिवारी मध्य नागपुरातील वंदे मातरम् उद्यानाचे लोकार्पण झाले, तसेच नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे वितरित करण्यात आले. रविवारी टिमकी येथील समाजभवनाचे भूमिपूजन झाले.

सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मनपा, नागपूर सुधार प्रन्यास, महारेल यांसह विविध यंत्रणांकडील शहरातील दीड हजार कोटी रुपयांहून अधिक विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडले. ही कामे एकूण सुमारे चार हजार कोटी रुपयांची असल्याचे सांगितले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांचे मताधिक्य कमी झाले होते, मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपने नागपूर शहरातील सहापैकी चार विधानसभा मतदारसंघ जिंकत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून महापालिका भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे गडकरी आणि फडणवीस यांच्या राजकीय वजनासाठी नागपूर महापालिकेची निवडणूक जिंकणे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement