Published On : Tue, Aug 17th, 2021

पुरातन वास्तूचे संरक्षण करून सक्करदरा तलावाचा विकास करा : महापौर

नागपूर : दक्षिण नागपुरातील भोसलेकालीन सक्करदरा तलाव हे नागपूरचे वैभव आहे. या पुरातत्व वास्तूचे संरक्षण करीत तलावाचे सौंदर्यीकरण व विकास करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी मंगळवारी आयोजित बैठकीत दिले.

सक्करदरा तलाव हा दक्षिण नागपुरातील जुना व ऐतिहासिक ठेवा आहे. महाराष्ट्र शासनच्या निधीतून याचा विकास होणार आहे. मात्र सौंदर्यीकरण कार्यादरम्यान तलावाच्या ऐतिहासिक बांधकामाचे संरक्षण होत नसल्याची तक्रार महापौरांना प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने महापौरांनी स्पष्ट निर्देश दिले की, पायऱ्यांचे बांधकाम करताना जुन्या प्रकारचा दगड वापरण्यात यावा. तलावालगतच्या मंदिराचासुद्धा हेरिटेज वस्तू नियमानुसार विकास करावा, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

सक्करदरा तलावाच्या सौंदर्यीकरण व विकास कार्यासाठी नागपूर महानगरपालिकेला २४ कोटी रुपये खर्चाची परवानगी महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झाली आहे. याअंतर्गत १० कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून ८.३५ कोटींचे कार्यादेश देण्यात आले आहे. आतापर्यंत ३.५० कोटीचे काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी शासनाकडून निधी अप्राप्त असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यासंदर्भात शासनस्तरावर बैठक घेण्याचे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले. बैठकीत कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, नेहरू नगर झोनचे कार्यकारी अभियंता धनंजय मेंढुलकर, कनिष्ठ अभियंता देवचंद काकडे, नगर रचना विभागाचे कोलते आणि राठोड, पर्यावरण विभागाचे संदीप लोखंडे, वेद चे दिनेश नायडू उपस्थित होते. सक्करदरा तलावाचा संपूर्ण परिसर ७.८० हेक्टर असून तलाव ३.६८ हेक्टर भागामध्ये आहे. मनपातर्फे लहान मुलांसाठी खेळण्याचे मैदान, अँम्पी थिएटर, फूड कोर्ट, उद्यानाचा विकास आणि तलावाचा दुसरीकडे असलेल्या जागेवर उद्यानाचे विकास करणे प्रस्तावित आहे. जाखापूर जगदंबा कन्स्ट्रक्शन कंपनी तलावाचा विकास करीत आहे. या कंपनीकडून रमेश होतवानी बैठकीला उपस्थित होते.