नागपूर: गारबा उत्सवाच्या निमित्ताने घडलेल्या एका साध्या घटनेने नागपूरमध्ये “मोरल पोलिसिंग”च्या वाढत्या प्रकरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. इयत्ता ११वीत शिकणारा एक विद्यार्थी आपल्या मित्रांसोबत गारबा सोहळ्यास सहभागी होण्याची योजना आखत होता. पण अचानक त्याने उत्सवात जाण्यास नकार दिला. कारण विचारल्यावर त्याने सांगितले. “पप्पांनी मनाई केली आहे, तुला एन्ट्री मिळणार नाही.”
हा निरागस संवाद केवळ दोन मित्रांमध्ये घडला असला, तरी यातून लहान मुलांच्या मनावर धार्मिक विभागणीचे बीज कसे पेरले जात आहे, हे दिसून येते. महाराष्ट्राची खरी ताकद म्हणजे त्याच्या बहुसांस्कृतिक परंपरेत आहे. गणेशोत्सव, गारबा, ईद किंवा ख्रिसमस असे सण समाजातील विविध घटकांना एकत्र आणतात. मात्र काही समित्या “शिस्त”च्या नावाखाली नियम लावून समाजात दुरावा निर्माण करत असल्याचे नागरिकांचे मत आहे.
राजकीय वर्तुळातून आलेली “गारबा समित्या स्वतःचे नियम करू शकतात” अशी विधाने पोलिस यंत्रणेवरही दबाव आणत आहेत. “लव्ह जिहाद”सारख्या प्रकरणांना कायद्याच्या चौकटीत हाताळणे आवश्यक आहे, पण त्याचा अर्थ प्रत्येक उत्सवात संशयाचे वातावरण निर्माण करणे नाही, असे नागरिक म्हणतात.
या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आर्त हाक दिली. त्याने म्हटले,
“देवभाऊ, आपण नेहमीच युवकांचे प्रेरणास्थान राहिला आहात. आजची गरज आहे की समाजात फूट पाडणाऱ्या प्रवृत्तीला थांबवा. कायदा हातात घेण्याऐवजी प्रत्येकाला आपले धार्मिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य द्या आणि महाराष्ट्राला अभिमानाने उभे करा.”
ही घटना फक्त दोन मित्रांपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण नागपूरकरांना आणि युवक वर्गाला विचार करायला लावणारी ठरली आहे. नागपूरकरांचा हा संदेश स्पष्ट आहे. उत्सवात मजा, आनंद आणि एकात्मतेला प्राधान्य द्या; भय, संशय आणि विभागणीला नाही.
समाजासाठी संदेश-
महाराष्ट्रातील प्रत्येक उत्सव हा सामाजिक बंध दृढ करण्यासाठी आहे. कायदा व प्रशासन योग्य मार्गदर्शन करतील; नागरिकांनी फक्त एकमेकांचा आदर करावा. युवा पिढीच्या स्वच्छ मनावर नैतिक विभागणीचे बीज पडू नये, हीच खरी गरज आहे.