Published On : Tue, Apr 17th, 2018

चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठ्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई: चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात पाणीटंचाई भासू नये यासाठी तातडीने अल्पकालीन उपाययोजना करण्याबरोबरच दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात पाणीटंचाई काळात पाणीपुरवठा करण्याबाबत आढावा बैठक आज मंत्रालयात मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस वित्तमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, आमदार नाना शामकुळे, महापौर अंजली घोटेकर, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील, महापालिका आयुक्त संजय काकडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव संतोष कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, चंद्रपूर शहराला पाणीपुरठा करणाऱ्या पाणी स्त्रोतामधील ज्या ठिकाणी पाणीसाठा कमी झाला आहे त्याठिकाणी गाळ काढण्याचे काम तातडीने हाती घ्यावे. या कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. गाळ काढल्यामुळे भविष्यात पाणीसाठा वाढण्यास मदत होईल असेही त्यांनी सांगितले.

श्री. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर शहराला पावसाळा येईपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या चंद्रपूर शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याचा 15 जूननंतर आढावा घेऊन आवश्यकतेनुसार उपाययोजना करण्यात याव्यात.