
नागपूर : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी सकाळी नागपूर विमानतळावरून राजस्थानकडे प्रस्थान केले. महाराष्ट्र, झारखंड आणि राजस्थान या राज्यांचा समावेश असलेल्या त्यांच्या चार दिवसीय बहुराज्यीय दौऱ्याचा हा पुढील टप्पा आहे. २४ ते २७ फेब्रुवारी दरम्यान हा दौरा पार पडत आहे.
राष्ट्रपती मुर्मू बुधवारी नागपूरात दाखल झाल्या होत्या. येथे ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे आयोजित “एकता आणि विश्वासातून महाराष्ट्राचा सुवर्णकाळ” या राज्यस्तरीय उपक्रमाच्या शुभारंभ सोहळ्यास त्यांनी उपस्थिती लावली. त्याआधी त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळावा २०२६ ला भेट देऊन कार्यक्रमाला संबोधित केले.
त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू नागपूरहून झारखंडमधील जमशेदपूर येथे रवाना झाल्या. तेथे श्री जगन्नाथ स्पिरिच्युअल अॅण्ड कल्चरल चॅरिटेबल सेंटर ट्रस्टतर्फे उभारण्यात येणाऱ्या श्री जगन्नाथ मंदिराच्या भूमिपूजन समारंभात त्यांनी सहभाग घेतला. तसेच त्यांनी मणिपाल टाटा मेडिकल कॉलेजलाही भेट दिली.
झारखंडमधील कार्यक्रम आटोपल्यानंतर त्या पुन्हा नागपूरात परतल्या आणि गुरुवारी सकाळी राजस्थानकडे रवाना झाल्या. त्यांच्या निरोपासाठी राज्यपाल आचार्य देवव्रत, एअर मार्शल येला उमेश, मेजर जनरल एन. एस. सोहल, महापालिका आयुक्त विजयलक्ष्मी बिदारी, पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
अधिकृत कार्यक्रमानुसार, २७ फेब्रुवारी रोजी राजस्थानातील पोखरण येथे राष्ट्रपती भारतीय हवाई दलाच्या ‘एक्स वायूशक्ती’ या सामरिक ताकद आणि युद्धसज्जतेच्या प्रात्यक्षिकास उपस्थित राहणार आहेत.
या चार दिवसीय दौऱ्याची सुरुवात २४ फेब्रुवारी रोजी मुंबईत झाली होती. येथे पीडी हिंदुजा रुग्णालयातर्फे आयोजित “सेव्हिंग लाइव्ह्ज अँड बिल्डिंग अ हेल्दीअर भारत” या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे उद्घाटन त्यांनी केले.








