Published On : Mon, Sep 20th, 2021

मनपा कर्मचा-यांची दंत तपासणी

Advertisement

महापौर दंत तपासणी शिबिर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहकार्याने संपन्न

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचा-यांसाठी सोमवारी (२० सप्टेंबर) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन ‍सिव्हिल लाईन्स येथे महापौर दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. मनपातर्फे शासकीय दंत महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित शिबिराचे उद्घाटन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले. महापौरांच्या संकल्पनेने व पुढाकाराने ‘आझादी -७५’ अंतर्गत संपूर्ण शहरामध्ये ७५ दंत तपासणी शिबिर घेण्यात येणार आहेत.

यावेळी वैद्यकीय आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अभय दातारकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे, उपायुक्त निर्भय जैन, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, दंत महाविद्यालयाचे डॉ. वैभव कारेमोरे व त्यांची संपूर्ण चमू उपस्थित होते.

मनपा मुख्यालयातील शिबिरामध्ये मनपाचे अधिकारी व कर्मचा-यांनी दंत तपासणी करून घेतली. तपासणीनंतर आवश्यकता असणा-या अधिकारी व कर्मचा-यांच्या दातांची सफाई, फिलिंग देखील दंत महाविद्यालयाच्या चमूद्वारे करण्यात आली. तपासणीमध्ये मुख कर्करोगाचा धोका असलेल्यांना आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले.

यावेळी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील आरोग्य सुविधेकडे विशेष लक्ष देण्याच्या उद्देशाने विविध भागामध्ये, परिसरात वेगवेगळी आरोग्य शिबिर आयोजित करून नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करण्याचे कार्य करण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे आरोग्य विभागाच्यावतीने शहरात डिसेंबर पर्यंत १०७ प्राथमिक आरोग्य तपासणी शिबिर घेण्याचा संकल्प करण्यात आला आहे व त्यादृष्टीने शिबिरांचे आयोजनही करण्यात येत आहे. अंधत्व निवारणाच्या दृष्टीने महापौर नेत्रज्योती योजनेंतर्गत कॅटरेक्टची शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात येत आहे. महापौर नेत्रज्योती योजनेंतर्गत महात्मे नेत्रपेढी येथे आतापर्यंत ९०० शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. ५००० शस्त्रक्रिया करण्याचे प्रस्तावित आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनेच्या माध्यमातून महात्मे नेत्रपेढी येथे रुग्णांची नि:शुल्क शस्त्रक्रिया केली जाते शिवाय लेन्स व आवश्यक चष्मा सुद्धा नि:शुल्क देण्यात येत आहे. याच श्रृंखलेमध्ये आता दंत तपासणी शिबिराचे आयोजन होत असल्याचा आनंद असल्याचेही ते म्हणाले. दातांच्या पुढील उपचारासाठी दंत महाविद्यालय व रुग्णालयामध्ये विशेष कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात विविध भागात जास्तीत जास्त दंत शिबिर आयोजित व्हावे यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा. शिबिर आयोजित करू इच्छीणा-या संस्थांनी महापौर कार्यालयामध्ये किंवा वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


डॉ. अभय दातारकर यांनी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्यापुढे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘आझादी-७५’ अंतर्गत नागपूर शहरातील विविध भागात महाविद्यालयाच्या सहार्याने ७५ दंत तपासणी शिबिर आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली. डॉ. दातारकर यांनी त्वरीत या संकल्पनेला होकार दर्शवित त्यासंदर्भात कार्यवाही सुरू केली, असे सांगतानाच पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच सामाजिक कार्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल महापौर दयाशंकर तिवारी यांनी डॉ. दातारकरांचे विशेष अभिनंदनही केले.

शिबिरामध्ये दातांची स्वच्छता, दातांमध्ये फिलिंग करणे, दात काढणे, खर्रा खाणा-यांना असलेल्या कॅन्सरच्या धोक्याबाबत तपासणीद्वारे योग्य माहिती देण्यात येणार आहे. याशिवाय एक दिवसापेक्षा जास्त कालावधीच्या उपचाराबाबतही शिबिरामध्ये तपासणी करण्यात येणार आहे. यानंतर पुढील उपचार शासकीय दरात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयामध्ये केले जाईल. यासाठी तेथे शिबिराच्या माध्यमातून येणा-या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष व वेगळी व्यवस्था सुद्धा करण्यात येणार आहे. शिबिरामध्ये जास्तीत नागरिकांनी सहभागी होउन दंत तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे. यावेळी कार्य अभियंता श्वेता बॅनर्जी, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, यांत्रिकी अभियंता उज्वल लांजेवार, दिपाली नासरे, म.न.पा.कर्मचारी युनियनचे रंजन नलोडे व कुणाल यादव आदी उपस्थित होते. या शिबिरामध्ये ११० कर्मचा-यांची दंत तपासणी करण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन ईश्वर मेश्राम यांनी केले तर आभार डॉ.नरेंद्र बर्हिवार यांनी मानले.