Published On : Mon, Sep 20th, 2021

प्रकाशक आणि वाचक यांच्यातील ग्रंथप्रदर्शन हा समृद्ध दुवा

Advertisement

नागपूर– वाचन संस्कृती बाबत अलिकडे अनेक नकारात्मक शेरेबाजी केली जाते. पंरतू जोवर ग्रंथप्रदर्शन यासारखे उपक्रम सुरु असतील तोवर वाचकांची वाचनाची भूक भागवण्याचे काम हे अविरत सुरुच राहील. खरे तर प्रकाशक आणि वाचक यांच्यातील ग्रंथप्रदर्शन हा समृद्ध दुवाच आहे असे मत नगरसेवक मनोज सांगोळे यांनी व्यक्त केले.

नागपूर येथील सी.एन.आय. सोशल सर्व्हिसेस इन्स्टिट्यूटच्या आय.एस.आय सभागृह, कॉफि हाऊस समोर, टूली हॉटेल जवळ, रेसिडिन्सी रोड, सदर नागपूर येथे येथे अभिषेक बुक सेंटरतर्फे आयोजित भव्य पुस्तक प्रदर्शनाचे उद्‌घाटन नगरसेवक मनोज सांगोळे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अभिषेक बुक सेंटरचे शशीभाई रॉय आणि दिनेश मंडल उपस्थित होते.

मनोज सांगोळे पुढे म्हणाले, ज्ञानाचे मूल्य कमी होत चाललेल्या कालखंडात पुस्तक प्रदर्शनांसारखे उपक्रम राबविणे ही काळाची गरज आहे. लेखक, प्रकाशक, विक्रेते आणि वाचक यांना सांधणारा दुवा म्हणजे पुस्तक प्रदर्शनाचे आयोजक. संस्कृतीचे सर्व प्रवाद आणि प्रवाह जोडणारा दुवा म्हणजे प्रकाशक आहेत.

या प्रदर्शनात ललित साहित्यासह क्रीडा, बागकाम, आरोग्य, पर्यटन, धार्मिक, विज्ञान, वास्तूकला, आध्यात्म आणि बालवाङ्मय अशा विविध साहित्य प्रकारांची मराठी आणि इंग्रजी पुस्तके विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. हे प्रदर्शन येत्या 15 ऑक्टोबर पर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.

अभिषेक बुक सेंटरचे शशीभाई रॉय म्हणाले, प्रकाशन व्यवसायातील अनिश्चितता आणि संदिग्धता लक्षात घेऊनही प्रकाशक धोका पत्करून नानाविविध साहित्यांचे प्रकाशन करीत संस्कृती जपण्याचे काम करीत असतात. लेखकाच्या लेखणीला न्याय देणारे सांस्कृतिक दूत म्हणून प्रकाशकांना संबोधल्यास अतिशयोक्ती होणार नाही. आज उद्घाटन करण्यात आलेले प्रदर्शन म्हणजे ज्ञानभाषा इंग्रजी आणि मायभाषा मराठी यांचा संवाद घडवून आणला जात आहे. वाचन संस्कृती कमी झालेली नसून त्याचे स्वरुप मात्र बदलले आहे. नवनवीन लेखक नाविन्यपूर्ण विषय घेऊन लेखन करीत असून त्याचे प्रकाशक आणि वाचकांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागतच होत आहे. अशा प्रदर्शनांमधून लेखन आणि वाचन संस्कृतीला पाठबळ मिळत असून त्याची सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होत आहे.

यावेळी अभिषेक बुक सेंटरचे दिनेश मंडल यांनी देखील थोडक्यात मनोगत व्यक्त केले.