Published On : Mon, Aug 31st, 2026
By Nagpur Today Nagpur News

दिल्लीतील धावत्या बसमध्ये पुन्हा अत्याचार; निर्भया कांडाच्या आठवणींनी राजधानी हादरली

Advertisement

दिल्लीतील धावत्या बसमध्ये पुन्हा अत्याचार; निर्भया कांडाच्या आठवणींनी राजधानी हादरलीनवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये अल्पवयीन मुलीवर धावत्या स्लीपर बसमध्ये अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील 16 वर्षीय विद्यार्थिनी आपल्या भावाला भेटण्यासाठी नोएडाच्या दिशेने जात असताना ही घटना घडल्याची माहिती आहे. या प्रकरणी बस चालक आणि कंडक्टरला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, 4 ऑगस्ट 2026 रोजी रात्री मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे पीडित मुलगी ग्रेटर नोएडातील परी चौक परिसरात थांबली होती. त्यावेळी एका स्लीपर बसला हात दाखवून तिने मदत मागितली. बस चालक कुलदीप आणि कंडक्टर संदीप यांनी तिला नोएडा सेक्टर 63 पर्यंत सोडण्याचे सांगून बसमध्ये घेतल्याचा आरोप आहे.

बस पुढे निघाल्यानंतर काही वेळातच कंडक्टरने तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. त्यानंतर चालक आणि कंडक्टर या दोघांनी तिच्यावर अत्याचार केल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले. विरोध केल्यास धमकावण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

सुमारे 47 किलोमीटरच्या प्रवासादरम्यान हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर काश्मिरी गेट परिसरातील रिंग रोडजवळ पीडितेला बसमधून उतरवून आरोपी निघून गेल्याचे सांगण्यात येते. धक्कादायक घटना घडल्यानंतरही पीडितेने धैर्य दाखवत काश्मिरी गेट पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.

तक्रार मिळताच दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला. काश्मिरी गेट पोलिसांनी तिमारपूर परिसरातून बस चालक आणि कंडक्टरला ताब्यात घेतले. संबंधित बसही पोलिसांनी जप्त केली असून ती फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. प्रकरणातील इतर पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून पुढील तपास केला जात आहे.

Advertisement

या घटनेची तुलना 2012 मधील दिल्लीतील निर्भया प्रकरणाशी केली जात आहे. धावत्या बसमध्ये घडलेल्या त्या घटनेनंतर देशभरात तीव्र संताप व्यक्त झाला होता आणि महिला सुरक्षेसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण उपाययोजना करण्यात आल्या होत्या.

मात्र, सार्वजनिक वाहतुकीत सुरक्षेच्या उपाययोजना असूनही अशा प्रकारच्या घटना समोर येत असल्याने महिला आणि मुलींच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बसमधील सुरक्षा व्यवस्था, चालक-कंडक्टरची पडताळणी आणि प्रवाशांच्या संरक्षणासाठी असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.