Published On : Mon, Aug 31st, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात मोठ्या भिशीच्या आमिषाने तिघांना १६.५५ लाखांचा गंडा; मुदत संपूनही ना नफा, ना मुद्दल!

Advertisement

नागपूर : मोठी भिशी चालवून आकर्षक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तीन जणांकडून तब्बल १६ लाख ५५ हजार ८०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उत्तर नागपुरात समोर आला आहे. भिशीची मुदत पूर्ण झाल्यानंतरही आरोपीने ना नफा दिला, ना जमा केलेली मूळ रक्कम परत केली. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मानेवाडा येथील किरण नारायण देवगडे (३२) यांची एका मित्रामार्फत नारी रोड परिसरातील गुरुप्रीतसिंह मनजीतसिंह वाडे याच्याशी ओळख झाली. आरोपीने आपण मोठी भिशी चालवत असल्याचे सांगून किरण आणि त्यांच्या मित्रांना पैसे गुंतविण्यास प्रवृत्त केले.

यानंतर नारी रोडवरील ‘मोगा मोटर्स’ कार्यालयात १३ जुलै २०२४ ते १६ डिसेंबर २०२५ या कालावधीत तिघांनी वेगवेगळ्या रकमा जमा केल्या. तक्रारीनुसार, आरोपीने किरण देवगडे यांच्याकडून ५ लाख ५६ हजार रुपये, नीरज यांच्याकडून ८ लाख ४९ हजार ८०० रुपये, तर प्रशांत गावंडे यांच्याकडून २ लाख ५० हजार रुपये घेतले.

मुदत संपली, मात्र पैसे परत मिळालेच नाहीत-
भिशीची ठरलेली मुदत पूर्ण झाल्यानंतर तिघांनी आरोपीकडे जमा रक्कम आणि ठरल्याप्रमाणे नफा मागितला. मात्र, आरोपीने पैसे देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आहे. वारंवार मागणी करूनही ना नफा मिळाला, ना मूळ रक्कम परत करण्यात आली.

अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिघांनी कपिलनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुरुप्रीतसिंह वाडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

आरोपीने आणखी काही नागरिकांकडून अशाच पद्धतीने पैसे उकळले आहेत का, याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे. तसेच आर्थिक व्यवहार, भिशीशी संबंधित कागदपत्रे आणि जमा केलेल्या रकमेच्या व्यवहारांचीही चौकशी केली जात आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.